जेव्हा गुरूला मिळणारा पुरस्कार आधी शिष्यालाच मिळाला

When the award to be received by the Guru was given to the disciple first

होय तुम्ही योग्य तेच वाचले आहे. कबड्डी क्षेत्रामध्ये आजतागायत फक्त पाच प्रशिक्षकांना भारत सरकारचा द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला आहे. या पाच जणांमधील एका प्रशिक्षकाला मात्र हा पुरस्कार मिळण्यासाठी खूप वाट पहावी लागली. एवढी की गुरुआधी त्याच्या एका शिष्यालाच द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला. कोण आहेत हे प्रशिक्षक आणि काय आहे त्यांची कहाणी? जाणून घेण्याचा एक प्रयत्न
आशियाई स्पर्धांमध्ये कबड्डीचा समावेश १९९० मध्ये झाला. या स्पर्धा होण्याआधी एक महिनाभर भारताचे प्रशिक्षक म्हणून रामबीर सिंग खोकर काम करत होते. त्यावेळी ते भारतीय क्रीडा प्राधिकरण म्हणजेच स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे कर्मचारीही होते. आशियाई स्पर्धांच्या ऐन तोंडावर भारतीय कबड्डी महासंघ आणि क्रीडा प्राधिकरणाच्या व्यवस्थापनांमध्ये काही कारणाने वाद निर्माण झाला. याची परिणती खोकर यांच्या गंच्छंतीमध्ये झाली. त्यांच्या जागी ई प्रसाद राव यांची भारतीय कबड्डी संघाचे प्रशिक्षक म्हणून नेमणूक झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने कबड्डीचे विजेतेपद मिळवले. त्या आशियाई स्पर्धांमध्ये भारताने मिळवलेले हे एकमेव सुवर्णपदक होते. पुढे २००२ मध्ये राव यांना भारत सरकारने द्रोणाचार्य पुरस्कार देऊन गौरविले. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले कबड्डी प्रशिक्षक ठरले.
खोकर यांना राष्ट्रीय स्तरावर आपला प्रभाव पुन्हा निर्माण करण्यासाठी आणखी पाच वर्षे जावी लागली. या दरम्यान ते भारतीय क्रीडा प्राधिकरणात प्रशिक्षक म्हणून काम करत होते. १९८७ साली पहिल्यांदा पार पडलेल्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप दरम्यान ते भारताचे प्रशिक्षक होते. त्यानंतर तब्बल ३० वर्षांनी १० व्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशिपमध्येदेखील त्यांची भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली. या दोनही स्पर्धांमध्ये भारताने सुवर्णपदक मिळवले. तब्बल तीस वर्षांच्या अंतराने खेळल्या गेलेल्या एकाच स्पर्धेच्या दोन वेगवेगळ्या हंगामांत एकच माणूस संघाच्या प्रशिक्षकपदी असण्याचे एक कदाचित एकमेव उदाहरण असू शकेल.
या दरम्यान खोकर यांनी अनेक खेळाडूंना मार्गदर्शन केले. यात त्यांचे एक शिष्य असलेल्या बलवान सिंग यांनी पुढे आशियाई स्पर्धा आणि विश्वचषकात भारताचे प्रशिक्षक म्हणून काम केले. खोकर यांचे शिष्य असलेल्या बलवान सिंग यांना २००५ मध्येच द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला. गुरु खोकर यांना मात्र हाच पुरस्कार मिळण्यासाठी २०१९ ची वाट पहावी लागली. असे असूनही खोकर यांची याबद्दल काहीही तक्रार नाही. उशिराने का होईना पण माझ्या कामाची पावती मिळाली यात मी समाधानी आहे असे ते म्हणतात. खोकर यांनी प्रो कबड्डीत पटना पायरेट्स आणि हरयाणा स्टीलर्स या संघांचे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.

 

Image: facebook/rambirsingh.khokhar