काय आहे श्रीकांत जाधवच्या इंस्टाग्राम अकाऊंटचं प्रकरण?

What Exactly Happened With Shrikant Jadhav’s Instagram Account?

प्रो कबड्डीमधील यूपी योद्धा संघाचा खेळाडू श्रीकांत जाधव याचे इंस्टाग्राम अकाऊंट नुकतेच हॅकर्सने हॅक केले होते. यामुळे श्रीकांतला हे अकाऊंट बंद करावे लागले.यामुळे काही तासांसाठी त्याचा जवळपास ७५००० हुन चाहत्यांशी संपर्क तुटला होता.

या प्रकरणात नक्की काय झाले यावर श्रीकांतने नुकतेच भाष्य केले. आपले इंस्टाग्राम अकाऊंट नक्की कसे हॅक झाले याबाबद्दल बोलताना तो म्हणाला,

“मला इंस्टाग्रामवर एक मेसेज आला होता.तुमचे अकाऊंट व्हेरिफाय करून घेण्यासाठी तुमची माहिती पुरवा अशा अर्थाचा तो मेसेज होता.हा मेसेज इंस्टाग्रामकडून आला आहे असे मला वाटल्याने मी माझी माहिती पुरवली.माझ्यासोबत अजूनही काही खेळाडूंना असाच मेसेज आलं होता.मात्र काही जणांनी त्याकडे फेक मेसेज म्हणून दुर्लक्ष केले.माझी माहिती पुरवल्यानंतर दोन तासांतच माझी सर्व माहिती अकाऊंटवरून काढून टाकण्यात आली.

त्यांनतर मी त्यांना मेसेज करून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी दुसऱ्या दिवशी मला प्रतिसाद दिला.आम्ही तुमचे अकाऊंट बंद करून टाकू असा धमकीवजा संदेश त्यांनी मला दिला.याचवेळी माझ्या अकाऊंटवरून बऱ्याच जणांना एक फेक मेसेजही केला गेला होता.माझे सगळे फोटो हॅकर्सने डिलीट करून टाकले.माझ्या अकाऊंटचे पूर्ण नियंत्रण त्यांच्याकडे गेले होते.

यानंतर अनेकांनी मला फोन करून तो मेसेज फेक असल्याचे सांगितले.मला माझा संघ यूपी योद्धाकडूनही फोनवर सांगण्यात की माझे अकाऊंट हॅक झाले आहे.यानंतर माझे अकाऊंट पुन्हा मिळवण्याचे सर्व प्रयत्न फोल गेले.याबाबत मी सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.या सर्व प्रकरणाची चौकशी पूर्ण करण्यासाठी बराच वेळ लागू शकतो.यामुळे मी नवे अकाऊंट सुरू केले. माझ्याबरोबर झालेल्या या प्रकारामुळे इतर खेळाडूंना शिकवण मिळेल आणि ते इथून पुढे काळजी घेतील अशी आशा मी करतो.”

श्रीकांतला तुम्ही आता त्याच्या नव्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फॉलो करू शकता. त्याचा इंस्टाग्राम आयडी आहे shrikantjadhav_22.