दीपक हुडासारखा फिटनेस करायचा तर हा आहार फॉलो करा
Want fitness like Deepak Hooda? Follow this diet

भारतीय कबड्डी संघ आणि जयपूर पिंक पँथर्स संघाचा कर्णधार दीपक हुडा हा कबड्डीजगतात सर्वाधिक फिट खेळाडू म्हणून ओळखला जातो. करोनामुळे सर्व स्पर्धा लांबणीवर पडलेल्या असताना दीपक घरीच वर्क आऊट करून आपला फिटनेस राखण्यावर भर देत आहे. फिटनेसवर भर देताना दीपक आपल्या आहारावरसुद्धा तेवढेच लक्ष देत आहे. दीपक त्याच्या आहारात नक्की कशाचा समावेश करतो याबद्दल अनेकदा त्याच्या चाहत्यांना प्रश्न पडतो. स्वतः दीपकने आता त्याच्या आहाराबद्दल अधिक माहिती दिली आहे.तो प्रो कबड्डी लीगने आयोजित ‘बियाँड द मॅट’ या इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये तो बोलत होता.
यावेळी दीपक म्हणाला,
“सकाळी सरावाला जाण्याअगोदर मी १-२ केळी खातो. सरावावरून परत आल्यावर मी बदाम मिल्क आणि कॉर्न फ्लेक्स खातो. याबरोबर मी कधीकधी अजून १-२ केळी खातो.कधीकधी मी ब्राऊन ब्रेडचा माझ्या आहारात समावेश करतो. यानंतर मी थेट दुपारचे जेवण घेतो. दुपारच्या जेवणात मी २-३ चपात्या आणि भाजी खातो. दिवसभरात जेव्हा शक्य होईल तेव्हा मी फळे खात असतो.”
“संध्याकाळी मी उपाशीपोटी सरावाला जाणे पसंत करतो.मी सामान्याआधीसुद्धा उपाशी राहणे पसंत करतो. संध्याकाळच्या सरावाहून परत आल्यावर मी पुन्हा बदाम मिल्क घेतो.”
“रात्रीच्या जेवणात मी दोन चपात्या आणि भाजी खातो.रात्री झोपण्याआधी मी न चुकता एक लिटर दुध पितो. आधी मी दोन अडीच लिटर दुध पित असे.मात्र आता वजन आटोक्यात ठेवण्याकरता मी एक लिटर दुध घेतो.”
दीपकने प्रो कबड्डीचे सर्व हंगाम खेळले आहेत. प्रो कबड्डी मधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून बऱ्याचदा त्याचा उल्लेख केला जातो.