ज्याच्याबरोबर खेळायला नको म्हटले त्याचाच सल्ला घेण्याची वेळ आली!

कबड्डी क्षेत्रात दीपक हुडाचे (Deepak Hooda) नाव माहित नाही असा माणूस सापडणे कठीण आहे. मात्र एक वेळ अशी होती की याच दिपकवर तो कबड्डी खेळतो म्हणून लोक हसले होते. कँडी या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत दिपकने याबद्दल सविस्तर माहिती दिली.
दीपक रोहतक जिल्ह्यातील चमरिया या छोट्याश्या खेड्यात राहत असे. घरची सगळी जबाबदारी त्याच्यावर असल्याने एका मित्राने त्याला आपल्या संघातून कबड्डी खेळण्याचे सुचवले. घराला थोडा हातभार लागेल असा विचार करून दिपकनेही त्या मित्राचा प्रस्ताव स्वीकारला. त्याचा दिवस पहाटे ३ वाजता सुरु होत असे. कबड्डीचा सराव करून तो ६:३० वाजता घरी येई. आवरासावर करून एका शाळेत शिकविण्यासाठी जाई. शाळेतून परत आला की शेतीचे काम उरकून तो पुन्हा कबड्डी खेळायला जात असे. ती दोन वर्षे दीपक अगदी रात्रीच्या जेवणानंतरही कबड्डीचा सराव करत असे. एवढ्या उशिरा कबड्डी खेळायला सुरुवात करून भारताच्या संघात स्थान मिळवणे तसे अवघडच. पण दीपक मात्र ठाम होता. एक वेळ तर अशी आली की दीपक वेडेपणा करतोय असे म्हणत लोक त्याच्यावर हसले होते. दिपकने मात्र आपला सराव सुरु ठेवला.
आपल्या खेळात आणखी सुधारणा व्हावी म्हणून दिपकने जवळच्या रिंधना गावात जाऊन जगमल सिंग नरवाल यांच्याकडे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्यासाठी त्याने आपल्या कमाईतून एक जुनी दुचाकी विकत घेतली. जगमल सिंग यांनी दिपकला स्थानिक स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी दिली. दिपकचा खेळ इतका सफाईदार झाला की आता त्याचे मित्र त्याच्या तिरस्कार करू लागले. त्याला आपल्याबरोबर गावात खेळू देईनासे झाले. अशा परिस्थितीत हारून न जात दिपकने एका सरकारी शाळेचे मैदान आपलेसे केले. त्या मैदानात एकट्याने सराव करत त्याने आपले कौशल्य वाढवले. अखेरीस एक वेळ आली की ज्या मित्रांनी त्याला आपल्याबरोबर खेळण्यास मनाई केली होती तेच दिपकचा सल्ला घेण्यासाठी आले.
दिपकच्या कष्टाला लवकरच फळ मिळाले आणि २०१४ साली वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत त्याला संधी मिळाली. हरयाणा संघाने या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आणि दीपक प्रकाशझोतात आला. याच वर्षी सुरु झालेल्या प्रोकबड्डी लीगमध्ये दिपकला दुसऱ्या क्रमांकही १२ लाख ६० हजारांची बोली लागली आणि पुढे काय झाले तर जगजाहीर आहे. प्रोकबड्डी बरोबरच दिपकने भारताकडून २०१६ दक्षिण आशियाई (South Asian Games) स्पर्धा, २०१६ विश्वचषक (Kabaddi World Cup 2016), २०१७ आशियाई स्पर्धा (Asian Games 2017), २०१८ दुबई मास्टर्स, २०१९ दक्षिण आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.