भल्याभल्यांना न जमलेला कारनामा या खेळाडूने करून दाखवला…
This player has achieved what no one has ever managed so far

प्रो कबड्डीचे आजवर सात हंगाम पार पडले. या सात हंगामात पटना पायरेट्सने तीन तर जयपूर पिंक पँथर्स, यू मुंबा, बेंगळुरू बुल्स आणि बंगाल वॉरियर्स या संघांनी प्रत्येकी एक विजेतेपद मिळवले आहे. पटना पायरेट्सने तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या हंगामाचे विजेतेपद मिळवत हॅटट्रिक साधली होती. विजेतेपदाच्या या आकडेवारीकडे नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येते. प्रो कबड्डीमधील १२ पैकी पाच संघानी आत्तापर्यंत विजेतेपद मिळवले आहे तर सात संघ अजूनही विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहेत.
प्रो कबड्डीच्या सर्व खेळाडूंमध्ये एका खेळाडूने असा कारनामा केला आहे की जो आजवर भल्याभल्यांना जमलेला नाही. हा खेळाडू म्हणजे महाराष्ट्राचा खेळाडू विशाल माने. विशाल माने आजतागायत एकूण पाच वेळा प्रो कबड्डी लीगच्या अंतिम सामन्यात खेळला आहे. अशी कामगिरी करणारा प्रो कबड्डी लीगमधील तो एकमेव खेळाडू आहे. पाच वेळा अंतिम सामना खेळला तरी विशालला यापैकी फक्त दोनदा विजेतेपद मिळवता आले आहे.
Related Posts
प्रो कबड्डीचे पहिले तीन हंगाम विशाल यू मुंबाकडून खेळला. या तीनही हंगामात यू मुंबाने अंतिम फेरी गाठली होती. पहिल्या हंगामात त्यांना जयपूर पिंकपँथर्सकडून पराभूत व्हावे लागले. दुसऱ्या हंगामात त्यांनी बेंगळुरू बुल्सला हरवत विजेतेपद मिळवले तर तिसऱ्या हंगामात ते पटना पायरेट्सकडून पराभूत झाले.
पाचव्या हंगामात विशाल पटना पायरेट्सकडून खेळला आणि त्यांनी गुजरातला नमवत विजेतेपद मिळवले. गेल्या वर्षी म्हणजे प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात विशाल दबंग दिल्ली संघाचा सदस्य होता. दबंग दिल्लीने अंतिम फेरी तर गाठली मात्र त्यांना बंगाल वॉरियर्सकडून पराभूत व्हावे लागले.
प्रो कबड्डी लीगची अंतिम फेरी पाचवेळा खेळणारा विशाल हा एकमेव खेळाडू असून इतर कोणालाही अशी कामगिरी करता आलेली नाही. आता प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात विशालची आणि त्याच्या संघाची कामगिरी कशी होते याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.