मैत्रिणीने नाव दिले म्हणून बनली कबड्डीपटू

This Kabaddi Star Has Her Friend To Thank For Being In Kabaddi

भारताची स्टार कबड्डीपटू पायल चौधरी ही अपघाताने कबड्डी खेळाडू बनली होती.वडील कमाल चौधरी राष्ट्रीय फुटबॉलपटू ,चुलते कृष्णकुमार चौधरी भारतीय फूटबॉल संघाचे सदस्य असताना पायल कबड्डीपटू कशी बनली याबद्दलचा किस्सा तिने नुकताच सांगितला. पायल एका कबड्डी इन्स्टाग्राम हँडलने आयोजित केलेल्या इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये बोलत होती.

यावेळी बोलताना पायल म्हणाली,

“मी मुळात एक धावपटू होते. शंभर मीटर, दोनशे मीटर आणि उंच उडी ह्या स्पर्धांमध्ये मी सहभागी होत असे. शाळेत एक कबड्डीची स्पर्धा असताना एका मैत्रिणीने माझे नाव संघाच्या यादीत टाकले.मी त्यापूर्वी कधीही कबड्डी खेळले नव्हते. मात्र तू एक धावपटू असल्याने तुला कबड्डी खेळणे जमेल असे त्या मैत्रिणीने मला सांगितले. जेव्हा खरोखर सामने सुरू झाले तेव्हा मला कबड्डीचे थोडेफार प्रशिक्षण देण्यात आले आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी कबड्डी खेळले. या सामन्यांना जे पंच होते त्यांना माझा खेळ खूप आवडला. त्यांनी मला चंदननगर येथील त्यांच्या क्लबमध्ये खेळण्यासाठी बोलावले. एकदा तिथे कबड्डी खेळायला सुरुवात केल्यावर मी मागे वळून पाहिले नाही.”

पुढे जाऊन पायलने भारतीय महिला संघात स्थान मिळवले. तिने भारताकडून २०१८ च्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप तसेच २०१६ च्या आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवले. इंडोनेशियामध्ये झालेल्या २०१८ आशियाई स्पर्धांमध्ये तिने भारताकडून रौप्यपदक मिळवले. देशांतर्गत स्पर्धांमध्ये पायल रेल्वेकडून खेळते.तिने यावर्षी पार पडलेल्या ६७ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते