करोनानंतर अशी असेल प्रो कबड्डी लीग

This Is How The Pro Kabaddi League Will Be After Corona

करोनाने सध्या सगळ्या जगात हाहाकार माजवला आहे.गेल्या २-३ महिन्यांपासून जगातील अनेक क्रीडास्पर्धा एकतर रद्द झाल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. भारतातील प्रो कबड्डी लीगदेखील याला अपवाद नाही.कबड्डीच्या चाहत्यांना प्रो कबड्डी लीग नक्की कधी सुरू होणार हा प्रश्न सतावत आहे. प्रो कबड्डी लीगचे कमिशनर अनुपम गोस्वामी यांनी यावर नुकतेच भाष्य केले. ते ट्वेन्टी फर्स्ट सेंच्युरी मीडियाने आयोजित केलेला वेबिनार ‘करोनानंतरचे क्रीडाक्षेत्र’ मध्ये बोलत होते.

यावेळी बोलताना गोस्वामी म्हणाले, “कबड्डी हा असा खेळ आहे की ज्यात खेळाडू सतत एकमेकांच्या संपर्कात येत असतात. इतर अनेक खेळ सुरू करण्याकरता काही मार्गदर्शक सूचना आल्या आहेत.मात्र दुर्दैवाने अजून ज्या खेळांत खेळाडू एकमेकांच्या संपर्कात येतात अशा खेळांच्या बाबतीत अजून काहीही माहीती उपलब्ध नाही. प्रो कबड्डी लीगचा हंगाम बराच मोठा असतो.या लीगमध्ये ९३ दिवसांत जवळपास २०० सामने खेळले जातात. हा एक मोठा उत्सव असतो.”

“असे असताना आम्ही लीगचे आयोजन करण्याआधी भारत सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन होईल याकडे लक्ष देऊ. तसेच लीगमधील संघांच्या मालकांशी चर्चा करून काय करता येईल हे ठरवू.खेळाडू आणि इतर लोकांच्या सुरक्षिततेकडे आम्ही जातीने लक्ष देऊ.”

“हे सगळे करत असताना आम्ही डिजीटल प्रसारणाद्वारे जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत कसे पोहोचता येईल, त्यांना कसे सामावून घेता येईल याकडे कटाक्षाने लक्ष देऊ.मैदानात प्रेक्षक उपस्थित नसले तरी त्यांना घरी बसून टीव्हीवर सामना पाहताना देखील मैदानावर असल्यासारखे कसे वाटेल याकडे आम्ही लक्ष देऊ.”

प्रो कबड्डी लीगचा नवा हंगाम कधी सुरू होईल याबाबत मात्र त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही.याचा अर्थ लीग नक्की कधी सुरू होणार हे कळण्यासाठी चाहत्यांना अजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे.