तेलगू टायटन्स संघाने मला अंधारात ठेवले – राहुल चौधरी
The Telugu Titans Kept Me In The Dark – Rahul Chaudhary

प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या हंगामानंतर आपल्याला संघातून वगळताना तेलगू टायटन्स संघाने याबाबत आपल्याला कुठलीही कल्पना दिली नव्हती असा गौप्यस्फोट भारताचा आघाडीचा कबड्डीपटू राहुल चौधरी याने केला. एका वेबसाईटच्या इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये बोलताना राहुलने याबाबत खुलासा केला.
प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामापासून ते सहाव्या हंगामपर्यंत राहुल तेलगू टायटन्स संघाकडून खेळला. पहिल्या हंगामापासून राहुलने चढाईपटू म्हणून अतिशय चांगली कामगिरी केली. चौथ्या हंगामात त्याने सर्वोत्कृष्ट चढाईपटूचा किताबही जिंकला होता. प्रसंगी खांद्याला दुखापत झालेली असतानाही तो खेळला. “तेलगू टायटन्स संघाला मी आपले घर मानत होतो.प्रो कबड्डी जोपर्यंत खेळेल तोपर्यंत याच संघाकडून खेळत राहील असे मला वाटत असे.मला हा संघ इतर कुठल्या संघाकडे जाऊ देणार नाही असा विश्वास होता.” असे राहुलने यावेळी बोलताना सांगितले.
असे असतानाही तेलगू टायटन्स संघाने आपल्याला दुसऱ्या संघाकडे जाऊ दिले याबाबद्दल वाईट वाटले असेही राहुल म्हणाला. सातव्या हंगामात राहुलला तमिळ थलायव्हाज संघाने आपल्या ताफ्यात घेतले.मात्र हा संघ फारशी छाप पाडू शकला नाही.या हंगामात राहुलने प्रो कबड्डीमध्ये १००० गुण नोंदविणारा दुसरा खेळाडू बनण्याचा मान मिळवला