हॅकर्सने आता थेट माजी भारतीय कर्णधारालाच गाठले

The hackers now set their target the former Indian captain, take over his Instagram!

भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार अजय ठाकूर हॅकर्सच्या जाळ्यात अडकला आहे. या हॅकर्सनी त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट काल संध्याकाळी हॅक केले. अजय हा इन्स्टाग्रामवर सर्वाधिक (२८३०००) फॉलोवर्स असलेला कबड्डीपटू आहे. त्यांनी अजयच्या अकाउंटवर इन्स्टाग्रामचा लोगो असलेले अनेक फोटो देखील अपलोड केले.

झाले असे की अजयला या हॅकर्सनी इन्स्टाग्रामवर एक मेसेज केला. त्यात त्यांनी आपण इन्स्टाग्रामचे कर्मचारी असल्याचे भासवून अजयने कॉपीराईटचा भंग केला असल्याचे सांगितले. तुम्ही जर असे केले नसेल तर या मेसेजला उत्तर द्यावे अथवा तुमचे अकाऊंट बंद करण्यात येईल असेही त्या मेसेजमध्ये लिहिले होते. या मेसेजमधील लिंकवर क्लिक करताच अजयचे अकाउंट त्यांच्या ताब्यात गेले.

अजयचे अकाऊंट हॅक झाल्याचे लक्षात येताच त्याचे सहकारी विशाल भारद्वाज, रोहित राणा यांनी आपापल्या इन्स्टाग्रामला स्टोरी टाकून चाहत्यांना याबाबत माहिती दिली. नजीकच्या काळात हॅकर्सच्या जाळ्यात अडकणारा अजय हा तिसरा कबड्डीपटू आहे. याआधी श्रीकांत जाधव, रोहित कुमार यांचीही अकाऊंट हॅक झाले होते.