सूरज देसाईला मिळालं वाढदिवसाचं स्पेशल गिफ्ट

Suraj Desai Gets A Special Birthday Gift

प्रो कबड्डी लीगच्या आपल्या पहिल्याच सामन्यात १८ गुण मिळवत विक्रम करणाऱ्या सूरज देसाईचा आज वाढदिवस. सिद्धार्थ देसाईचा भाऊ अशी त्याची ओळख असली तरी सुरजनेदेखील प्रो कबड्डीत आपली छाप पाडली आहे.

आजचा वाढदिवस सूरजसाठी एका वेगळ्या कारणाने खास ठरला. ते कारण म्हणजे सुरजच्या पत्नीने त्याला दिलेलं स्पेशल गिफ्ट. सुरजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या पत्नीने त्याच्यासाठी स्वतः एक भेटकार्ड बनवून त्याला दिलं. या भेटकार्डावर तिने सूरजचे चित्र रेखाटले असून त्याच्यासाठी एक छोटीशी कविता देखील लिहिली आहे. सुरजने ह्या भेटकार्डाचा फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करत आपल्या बायकोचे आभार मानले आहेत.

सूरज खरेतर दुसऱ्या हंगामापासून प्रो कबड्डी संघाचा सदस्य राहिला आहे. मात्र प्रत्यक्ष सामन्यात खेळण्याची संधी त्याला सातव्या हंगामात मिळाली. त्यानेही मिळालेल्या संधीचा फायदा उठवताना पहिल्याच सामन्यात १८ गुण नोंदवले. यावेळी त्याने आपला भाऊ सिध्दार्थचा पदार्पणाच्या सामन्यातील १५ गुणांचा विक्रम मोडीत काढला होता.