तर श्रीलंकेत होणार प्रो कबड्डी लीग
Sri Lanka may host the Pro Kabaddi League

करोनामुळे प्रो कबड्डी लीगचा या वर्षीचा हंगाम अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आला आहे.भारतातील सध्याची परिस्थिती पाहता प्रो कबड्डी लीग कधी होईल याबाबद्दल सध्यातरी काहीच निश्चित नाही. अशातच आता ही लीग श्रीलंकेत होऊ शकते अशी बातमी पुढे आली आहे. सिलॉन टुडेने दिलेल्या वृत्तानुसार या वर्षीच्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यांत प्रो कबड्डी लीग श्रीलंकेत पार पडू शकते.
श्रीलंका कबड्डीचे अध्यक्ष अनुरा पाथिराणा यांनी याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले,
“प्रो कबड्डीशी संबंधीत सुत्रांशी आमची बातचीत झाली आहे.श्रीलंकेत प्रो कबड्डी लीग आयोजित करण्याची आमची तयारी असल्याचे आम्ही त्यांना सांगितले. त्यांनीसुद्धा या कल्पनेला पाठिंबा दर्शवला आहे.त्यामुळे प्रो कबड्डी लीगचा हंगाम ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आयोजित करण्याची श्रीलंकेला चांगली संधी आहे.”
प्रो कबड्डी लीगमध्ये श्रीलंकन खेळाडूंच्या सहभागाबाबत बोलताना पाथिराणा म्हणाले,
“प्रो कबड्डीच्या सुरुवातीच्या हंगामांत श्रीलंकेचे तीन खेळाडू सहभागी झाले होते.मात्र आता प्रो कबड्डी लीग श्रीलंकेत होणार असेल तर हा आकडा वाढेल अशी आमची अपेक्षा आहे.”
प्रो कबड्डी लीग श्रीलंकेत पार पडल्यास या देशात कबड्डीची लोकप्रियता वाढण्यास अजून मदत होईल.