सगल दुसऱ्यांदा सिद्धार्थ देसाईला कोट्यावधी रुपयांची बोली, ‘इतक्या’ कोटींमध्ये तेलुगु टायटन्सने केले कायम

प्रो कबड्डीच्या ८ व्या हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी २९, ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. यंदा लिलावात स्टार खेळाडू सिद्धार्थ देसाईला तब्बल १ कोटी ३० लाख इतकी किंमत मिळाली आहे.
सिद्धार्थला तेलुगु टायटन्सने संघात कायम केले आहे. त्याला संघात घेण्यासाठी युपी योद्धा आणि पटना पायरेट्समध्ये चढाओढ सुरु होती. अखेर युपी योद्धाने १ कोटी ३० लाखांच्या किंमतीत बोली जिंकली. मात्र, त्याचवेळी तेलुगु टायटन्सने फार विचार न करता एफबीएम कार्डचा वापर केला आणि सिद्धार्थला १ कोटी ३० लाखांच्या किंमतीत आपल्या संघात कायम केले.
सिद्धार्थने मागील हंगामात तेलगुकडून चांगला खेळ केला होता. त्याने मागील हंगामात एकूण २२० पॉइंट्स मिळवले होते. त्यातील २१७ पॉइंट्स त्याने चढाई करताना मिळवले होते. तो सर्वाधिक रेड पॉइंट्स मिळवणाऱ्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर होता. त्याआधी सहाव्या हंगामातून त्याने प्रो कबड्डीमध्ये पदार्पण केले होते.
त्याने पदार्पणाच्या हंगामात रेडींग आणि टॅकल पॉईंट मिळून २२१ पॉइंट मिळवले होते. यातील २१८ पॉइंट्स त्याने रेडींगमध्ये मिळवले होते. तो ६ व्या मोसमात सर्वाधिक रेडींग पॉइंट मिळवणारा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला होता.
सोमवारी (३० ऑगस्ट) परदेशी खेळाडूंचे, तसेच भारताच्या अ गटातील खेळाडूंचा लिलाव झाला. यामध्ये भारताच्या अ लिलावाच्या गटात चढाईपटूंच्या (रेडर्स) यादीत सिद्धार्थचा समावेश होता. त्याची मुळ किंमत ३० लाख होती. सिद्धार्थला मागील हंगामात तेलुगु टायटन्सने १ कोटी ४५ लाखांची बोली लावली होती.