रोनाल्डो की मेस्सी? कोण आवडतो रोहितला?

Ronaldo or Messi? Here's what Rohit Kumar has chosen 

– नचिकेत धारणकर

लॉकडाऊनमध्ये कबड्डी प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरलेल्या प्रो कबड्डी लीगच्या बियॉंड द मॅट या कार्यक्रमाची रोहित कुमारच्या भागाने सांगता झाली. आपल्या आवडत्या खेळाडूविषयी अनेक नवीन गोष्टी तसेच त्यांच्या आवडी निवडी माहित करून घेता आल्याने हा कार्यक्रम चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला.

या कार्यक्रमात चाहते तसेच कार्यक्रमाचा  सूत्रसंचालकी खेळाडूला काही प्रश्न विचारतात. यामध्ये रॅपिड फायर हादेखील एक भाग असतो ज्यामध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर खेळाडूला लगेच कोणताही विचार न करता द्यायचे असते. रोहितलासुद्धा रॅपिड फायरमध्ये “तू कबड्डी व्यतिरिक्त अजून कोणते खेळ फॉलो करतो?” असा प्रश्न विचारला गेला. या प्रश्नाचे उत्तर देताना रोहित म्हणाला,

“मी फुटबॉलचा चाहता आहे आणि फुटबॉल सामने पाहतो. लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, नेमार ज्युनिअर हे खेळाडू मला आवडतात.” रोहितच्या या उत्तरावर सूत्रसंचालकाने त्याला फुटबॉल जगतात सर्वात जास्त वेळा विचारला जाणारा आणि सर्वात जास्त वादग्रस्त प्रश्न विचारला. तो म्हणजे, “तू रोनाल्डो आणि मेस्सी दोघांपैकी कोणाचा चाहता आहेस?”. त्यावर रोहितने आपण मेस्सीचे चाहते आहोत असे सांगितले. या आधी रिशांक, दीपक हुड्डा, मनिंदर, पवन, परदीप या सगळ्यांनी रोनाल्डो त्यांचा आवडता खेळाडू असल्याचे सांगितले होते. मेस्सीचा चाहता असलेला रोहित हा एकमेव कबड्डी खेळाडू असावा.

काही दिवसांपूर्वीच मेस्सीने आपल्या कारकिर्दीतील ७०० वा गोल केला. रोहितने प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या हंगामात बेंगळुरू बुल्सला आपल्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळवून दिले होते.