रिशांक म्हणतो या तीन गोष्टी असतील तर चांगले रेडर बनाल!

Rishank says imbibing these three things can make you a fine raider!

कबड्डीमध्ये चांगला रेडर बनायचे झाल्यास कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे याबद्दल रिशांक देवाडिगाने नुकतेच मत मांडले. रिशांक प्रो कबड्डी लीगच्या इंस्टाग्राम हँडलवरून आयोजित ‘बियॉंड द मॅट’ या लाईव्ह सत्रात बोलत होता.
कबड्डी खेळाडूंनी एक चांगला रेडर होण्याकरता त्यांच्याकडे कोणते कौशल्य असले पाहिजे असा प्रश्न रिशांकला विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना रिशांक म्हणाला,
“मला वाटते रेडरकडे चांगला वेग आणि चांगले फुटवर्क असले पाहिजे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो निर्भय असला पाहिजे. रेडर निर्भय असेल तरच तो प्रतिस्पर्धी संघाच्या सात खेळाडूंवर चढाई करून पॉईंट घेण्याची क्षमता ठेवू शकतो. या तीन गोष्टी माझ्या आजवरच्या खेळातील आधारस्तंभ ठरल्या आहेत.”
यावेळी रिशांकने अजून एका महत्वाच्या गोष्टीवर भाष्य केले. प्रत्येक सामन्याआधी रिशांक तो सामना कसा होईल? त्या सामन्यातील आपली प्रत्येक रेड कशी असेल? याचा विचार करतो.  याबद्दल बोलताना रिशांक म्हणाला,
“प्रत्येक सामन्याआधी मी थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवतो. या वेळात मी एकटा बसून सामन्यात मी जास्तीत जास्त पॉईंट्स कसा घेऊन शकेल याबद्दल विचार करतो. ही पद्धत वापरल्याने सामन्यातील परिस्थितीनुसार माझ्या शरीराकडून प्रतिसाद मिळवणे मला सोपे जाते. ही पद्धत वापरल्याने मला प्रतिस्पर्धी संघाच्या कच्च्या आणि मजबूत गोष्टी सामन्याआधी लक्षात येतात. यामुळे मी रेडला जाण्याअगोदर माझी मानसिक तयारी झालेली असते. मी अनेकदा ध्यानधारणा देखील करतो. याचा मला सामन्याआधी मानसिक तयारी करण्यासाठी उपयोग होतो.”
रिशांकने यु मुंबाकडून खेळताना प्रो कबड्डीचे विजेतेपद मिळवले होते. सध्या तो युपी योद्धा संघाकडून खेळतो.