प्रो कबड्डीच्या हक्कांचा लिलाव होणार? संघमालकांनी स्टारची ऑफर नाकारली…

Pro Kabaddi rights to be auctioned again? The team owners turn down Star's offer

भारताची दुसऱ्या क्रमांकाची लोकप्रिय लीग असलेल्या प्रो कबड्डीच्या मीडिया हक्कांचा यावर्षीच्या अखेरीस पुन्हा एकदा लिलाव होऊ शकतो. संघमालक, प्रो कबड्डीचे उद्गाते मशाल स्पोर्ट्स आणि स्टार इंडिया यांच्यामध्ये महसूल वाटपाबाबत एकमत होत नसल्याने हा निर्णय होऊ शकतो.
इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सर्व संघमालक या मुद्द्यावर एकत्र आले असून त्यांनी महसूल वाटपाबाबत स्टार इंडियाकडून अधिक रकमेची मागणी केली आहे. स्टार इंडिया जर नवी अधिक आकर्षक ऑफर संघमालकांना देऊ शकत नसेल तर मीडिया हक्कांचा पुन्हा लिलाव करण्यात यावा अशी संघमालकांची मागणी आहे.
स्टार इंडियाने प्रत्येक संघाला पुढील पाच वर्षांसाठी दर वर्षी प्रत्येकी १४-१५ कोटी रुपये देऊ केले आहेत. मात्र संघमालकांना दरवर्षी प्रत्येकी २२ कोटी मिळावेत अशी अपेक्षा आहे. स्टार इंडियाचा मशाल स्पोर्ट्समध्ये ७५% पालकत्व आहे. त्यामुळे त्यांच्या हितसंबंधांचा मुद्दाही संघमालकांनी उपस्थित केला आहे.
प्रसिद्ध क्रीडा समालोचक चारू शर्मा आणि महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी १९९४ मध्ये मशाल स्पोर्ट्सची स्थापना केली होती. मात्र प्रो कबड्डी लीगसाठी प्रसारक मिळवण्यासाठी त्यांना बरेच झगडावे लागले. अखेरीस २०१४ मध्ये स्टार इंडियाने प्रो कबड्डी लीगच्या प्रसारणात रस दाखवला होता. यानंतर अल्पावधीत प्रो कब्बडी लीग प्रचंड लोकप्रिय होऊन भारतातील दुसऱ्या क्रमांकाची लीग बनली.
याबाबत बोलताना तेलगू टायटन्सचे संघमालक श्रीनिवास श्रीरामानेनी म्हणाले, “सध्या दोन्ही पक्षांमध्ये बोलणी सुरु आहेत. स्टार इंडियाला अजून एकी चांगली ऑफर देण्याची संधी आहे. त्यांची ऑफर सगळ्यांना मान्य झाली नाही तर पुन्हा एकदा लिलाव करण्यात येईल.”
प्रो कबड्डी लीगच्या मीडिया हक्कांचे  नूतनीकरण २०२० च्या हंगामापासून होणार होते. मात्र करोनामुळे यंदाचा हंगाम रद्द झाल्यात जमा असल्याने आता पुढील पाच वर्षांसाठी या हक्कांचे नूतनीकरण करण्यात येईल. मशाल स्पोर्ट्स आणि संघमालक यांच्यातील वादाबाबत सर्वप्रथम डिसेंबर २०१८ मध्ये इकॉनॉमिक टाइम्सने वृत्त दिले होते.