प्रो कबड्डी आयोजकांना फुटलाय घाम, असे झाले तर होणार मोठे नुकसान!
Pro Kabaddi League may face huge losses if this happens

करोनामुळे प्रो कबड्डी लीगचा या वर्षीचा हंगाम कधी सुरू होणार याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय लीग आयपीएल सप्टेंबरमध्ये दुबईमध्ये होणार आहे. असे असताना देशातील दुसऱ्या क्रमांकाची लीग कधी सुरू होणार याबाबत अजूनही अस्पष्टता आहे. अशातच प्रो कबड्डी लीगच्या आयोजकांसाठी आणखी एक वाईट बातमी आली आहे.
करोनामुळे प्रो कबड्डी लीगचे आयोजक मशाल स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्स यांनी सध्या ‘थांबा आणि वाट पहा’ असे धोरण स्वीकारले आहे.प्रो कबड्डी मधील काही संघांनी आपली मैदाने कोव्हिड केंद्र म्हणून सरकारच्या ताब्यात दिलेली आहेत. यामुळे संघाच्या सरावावरसुद्धा मर्यादा आल्या आहेत.
जर प्रो कबड्डीचा यंदाचा हंगाम रद्द झाला तर आयोजकांचे तब्बल ६० कोटींचे नुकसान होऊ शकेल. प्रो कबड्डी लीगचा व्हीवो या चिनी कंपनीबरोबर प्रायोजकत्व करार आहे. प्रो कबड्डी लीग रद्द होण्याचा परिणाम थेट या करारावर होऊ शकतो आणि आयोजकांना मोठा महसूल गमवावा लागू शकतो. भारत सरकारने नुकतीच चिनी ऍप्स वर बंदी घातली होती. व्हीवो हीसुद्धा चिनी कंपनी असल्याने हे कदाचित त्याचेही पडसाद असू शकतात.भारत चीन यांच्या या वादात प्रो कबड्डी लीगचे मोठे नुकसान होऊ शकते.
व्हीवो कंपनीनेसुद्धा आपल्या जाहिरातीत भारतीय सेलेब्रिटीजला घेणार नाही अशी घोषणा केली होती.