प्रो कबड्डीच्या ८ व्या हंगामाच्या लिलावाला प्रारंभ, पहिल्या दिवशी ‘या’ ४ खेळाडूंचे उजळले नशीब

प्रो कबड्डीच्या ८ व्या हंगामाचा थरार येत्या डिसेंबर महिन्यात पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेकरिता नवीन आणि युवा खेळाडूंना संधी मिळावी म्हणून ३ दिवसीय खेळाडूंचा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. रविवारी ( २९ ऑगस्ट) या लिलावाचा पहिला दिवस पार पडला. या दिवशी कुठल्या खेळाडूंचे नशीब उजळले चला पाहूया.

गेल्या काही वर्षांपासून प्रो कबड्डी लीग स्पर्धेत युवा खेळाडूंचा बोलबाला राहिला आहे. युवा खेळाडूंनी ही स्पर्धा गाजवली आहे, पण या लिलावात फ्रेंचायजींनी युवा खेळाडूंना आपल्या संघात स्थान देण्यास रस दाखवला नाही. लिलावाच्या पहिल्याच दिवशी १२ फ्रेंचायजींनी अवघ्या ४ खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिले आहे.

लिलावाच्या पहिल्या दिवशी पुणेरी पलटणने २ खेळाडूंना आपल्या संघात संधी दिली आहे. तर तेलुगू टायटन्स आणि यूपी योद्धा या संघांनी प्रत्येकी एक एक खेळाडूला आपल्या संघात संधी दिली आहे. या खेळाडूंना किती रुपयांची बोली लावून आपल्या संघात स्थान देण्यात आले आहे, याबाबत कुठलाही खुलासा करण्यात आला नाहीये. तसेच उर्वरित १२ फ्रेंचायजींनी आपल्या शिल्लक रकमेबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, फ्रेंचायजी ‘अ’ श्रेणीतील कबड्डीपटूंची वाट पाहत आहेत.

चाहत्यांसाठी आनंदाची बाब अशी की, राहुल चौधरी, प्रदीप नरवाल, सिद्धार्थ देसाई, मोनु गोयत, रिशांक देवाडिगा, नितीन तोमर, रवींद्र पेहल, बलदेव सिंह, अजय ठाकूर, मनजीत चिल्लर, दीपक निवास हुड्डा, रोहित कुमार, सचिन तनवर, रोहित गुलिया यांसारखे आणखी स्टार खेळाडू लिलावात सहभागी झाले आहेत.(Pkl season 8,day 1 auction full players list)

लिलावाच्या पहिल्या दिवशी निवड करण्यात आलेले खेळाडू
१) मोहित गोयत – पुणेरी पलटण
२) प्रिन्स – तेलुगू टायटंस
३) गोविंद गुरजर – पुणेरी पलटण
४) नितीन पनवर – यूपी योद्धा