तुम्हाला वेड लागलंय असं लोक म्हटले पाहिजेत – राहुल चौधरी

प्रो कबड्डीमुळे अनेक तरुण कबड्डीकडे आकर्षित होत आहेत.अनेकजण या क्षेत्राचा करिअर म्हणून विचार करत आहेत. कबड्डी क्षेत्रात नव्याने येणाऱ्या तरुणांनी यशस्वी होण्यासाठी काय करणे गरजेचे आहे याबद्दल प्रसिद्ध कबड्डीपटू राहुल चौधरी याने मार्गदर्शन केले. प्रो कबड्डी लीगने आयोजित केलेल्या इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये राहुल बोलत होता.

यावेळी तरुणांना मार्गदर्शन करताना राहुल म्हणाल, “अभ्यास असो वा खेळ, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी त्या गोष्टीचा ध्यास घेणे गरजेचे आहे.कुठल्याही परिस्थितीत मी यशस्वी होणारच असा आत्मविश्वास बाळगणे गरजेचे आहे. त्या गोष्टीचा इतका सराव करा की बरोबरचे लोक तुम्हाला वेड लागले आहे असे म्हणतील.जेव्हा लोक तुम्हाला असे म्हणतील तेव्हा तुम्ही यशाची पहिली पायरी चढलेली असेल. तुम्हाला शिकायच्या असलेल्या तंत्रांचे व्हिडीओ यूट्यूबवर बघूनसुद्धा तुम्ही त्याचा सराव करू शकता.याबरोबरच एक यशस्वी चढाईपटू बनायचे असल्यास तुम्हाला हँड टच, बोनस आणि टर्निंग ही तीन कौशल्ये आत्मसात केलीच पाहिजेत.”

राहुल प्रो कबड्डी लीगमध्ये तमिळ थलायवाज संघाकडून खेळतो.याआधीचे सहा हंगाम तो तेलगू टायटन्स संघाकडून खेळला. प्रो कबड्डीमध्ये १००० पॉईंट्स नोंदीवणारा राहुल केवळ दुसराच खेळाडू ठरला होता.