प्रो कबड्डीमधील भावांच्या जोड्या
Pairs of brothers in Pro Kabaddi

प्रो कबड्डी लीग सुरु होऊन आता जवळपास सहा वर्षे लोटली आहेत. पहिल्या हंगामापासून या लीगने लोकप्रियतेचे सगळे विक्रम मोडीत काढले. या लीगमुळे अनेक नव्या खेळाडूंना कबड्डीत कारकीर्द घडविण्याची संधी मिळाली. यामध्ये काही असेही खेळाडू आहेत जे एकमेकांचे भाऊ आहेत. या लेखातून प्रो कबडीमधील भावांच्या जोड्यांवर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न
१. नितीन मदने आणि कृष्णा मदने
मदने बंधूंमधला मोठा नितीन प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामात बंगाल वॉरियर्सकडून खेळला. या हंगामात त्याने १०० हुन अधिक रेड पॉईंट्स नोंदवत चांगली कामगिरी केली होती. दुखापतीमुळे नितीनला दुसऱ्या आणि तिसऱ्या हंगामाला मुकावे लागले. चौथ्या हंगामात त्याने यू मुंबाकडून पुनरागमन केले. चौथा आणि पाचवा हंगाम यू मुंबाकडून खेळल्यापासून त्याला प्रो कबड्डीत पुन्हा संधी मिळालेली नाही. मध्यंतरी नितीनने एका स्थानिक स्पर्धेत खेळताना एकाच रेडमध्ये ९ पॉईंट्स घेतले होते. त्या रेडचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामुळे कदाचित आगामी हंगामात नितीन मदने पुन्हा एका प्रो कबड्डीत दिसण्याची शक्यता आहे.
नितीनचा धाकटा भाऊ कृष्णाने प्रो कबड्डीच्या तिसऱ्या हंगामात बंगाल वॉरियर्सकडून पदार्पण केले. मात्र त्याला केवळ एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. त्याने सहाव्या हंगामात तेलगू टायटन्सकडून पुनरागमन केले. या हंगामात त्याने एक बदली खेळाडू म्हणून चांगली कामगिरी केल्याने सातव्या हंगामात त्याला संघामध्ये कायम ठेवण्यात आले. या हंगामात त्याने १२ सामन्यांत १६ टॅकल पॉईंट्स मिळवले.
२. सुनील मलिक आणि सुमित मलिक
Related Posts
गुजरात फॉर्च्युन जायंट्सचा कर्णधार म्हणून सुनिलला सगळेच ओळखतात. मात्र सुनीलचा धाकटा भाऊ सुमित हा देखील त्याच्याच संघाकडून खेळला आहे. सुनील गुजरातच्या संघाकडून कव्हर म्हणून खेळतो. त्याची आणि परवेश भैंसवालची जोडी कबड्डी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. सुनीलने भारताचेही प्रतिनिधीत्व केले आहे. या दोघांमध्ये सुमित हा धाकटा असून त्याने गेल्या हंगामात प्रो कबड्डी लीगमध्ये पदार्पण केले होते. त्याने गुजरतकडून १५ सामने खेळले. सुनील हा पाचव्या हंगामापासून गुजरातकडून खेळत आहे. सहाव्या हंगामापासून त्याने संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी पेलली आहे.
३. धर्मराज चेरलातन आणि धर्मराज गोपू
धर्मराज चेरलातन ज्याला अण्णा नावाने ओळखले जाते तो आणि आणि त्याचा भाऊ धर्मराज गोपू या दोघांनी प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामात पदार्पण केले. अण्णाने बंगळुरूकडून तर गोपूने तेलगू टायटन्सकडून आपल्या प्रो कबड्डी कारकिर्दीची सुरुवात केली. गोपूला पहिला हंगाम सोडल्यास नंतर फारशी संधी मिळाली नाही. अण्णाने मात्र प्रो कबड्डीचे सातही हंगाम खेळले. या सात हंगामांत त्याने ११८ सामन्यांत ३०२ पॉईंट्स मिळवले. तो प्रत्येक सामन्यात सरासरी १.९८ टॅकल पॉईंट्स मिळवतो. अण्णाने पटना पायरेट्सकडून प्रो कबड्डीचे विजेतेपदही मिळवले आहे.
४. सिद्धार्थ आणि सुरज देसाई
महाराष्ट्राच्या या बंधूंना ओळखत नाही असा कबड्डी फॅन शोधूनही सापडणार नाही. थोरला भाऊ सुरजला प्रो कबड्डीच्या दुसऱ्या हंगामात जयपूर पिंक पँथर्सने आपल्या संघात घेतले. मात्र या हंगामात त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. पाचव्या हंगामात त्याला दबंग दिल्लीने संधी दिली मात्र याही वेळेस त्याला सामना खेळायला मिळाला नाही. अखेरीस सातव्या हंगामात तेलगू टायटन्सने पुन्हा एकदा त्याला संधी दिली. सुरजने या संधीचा चांगला फायदा उठवताना १२ सामन्यांत ४५ पॉईंट्स मिळवले.
सिद्धार्थने आपल्या पदार्पणाच्या हंगामात कबड्डी जगतात अक्षरशः वादळ आणले होते. सहाव्या हंगामात त्याने २२१ पॉईंट्स मिळवत आपले नाणे खणखणीत वाजवले. त्यानंतर सातव्या हंगामात तो प्रो कबड्डीचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. याही हंगामात त्याने तेलगू टायटन्सकडून २२० पॉईंट्स मिळवले.