महाराष्ट्र राज्य कबड्डी पंचांसाठी ऑनलाईन वर्कशॉप

महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या पंचसमितीच्या वतीने, पुणे जिल्हा कबड्डी असो.च्या सहकार्याने महाराष्ट्र राज्यस्तरीय राष्ट्रीय/राज्य/जिल्हास्तर उत्तिर्ण कार्यरत कबड्डी पंचांची कबड्डी नियम उजळणी/अंमलबजावणी बाबतीत ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
सध्याच्या परिस्थितीत कोरोना व्हायरस साथीचा फैलाव आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व कबड्डी पंच आपआपल्या घरात आहेत. त्या सर्व पंचांना कबड्डी नियमांबाबत उजळणी व्हावी या उद्देशाने उपरोक्त उपक्रम राबविण्यात आला आहे. सदर उपक्रमात महाराष्ट्रातील ४०० हून अधिक कबड्डी पंचांनी आपला ऑनलाईन सहभाग नोंदविला आहे.
सदर कार्यशाळा कार्यक्रमांत मिनानाथ धानजी, शशी राऊत, अजित पाटील, सतिश सुर्यवंशी, रविंद्र म्हात्रे, राजेंद्र आंदेकर आदी महाराष्ट्रातील माजी, निष्णात, जेष्ठ कबड्डी पंचांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तर मंगल पांडे, रविंद्र देसाई, मनोहर इंदूलकर, हरेश्वर कोळी, रमेश भेंडीगिरी आदी मान्यवरांच्या अनुभवाचे बौध्दिक लाभणार आहे.
सदर ऑनलाईन सेमिनारचे उदघाटन ऑनलाईनवर आज दि. ६ मे रात्रौ ७-३० वा. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.चे सरकार्यवाह अॅड. आस्वाद पाटील यांचे उपस्थितीत करण्यात येणार आहे.
सदर पंच कार्यशाळा दि. ०६ ते १५ मे पर्यंत रात्रौ ७-३० ते ९-०० या वेळेत चालणार असुन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय कबड्डी पंच योगेश यादव हे पुणे येथून करणार आहेत.