परदीप नाही तर हा आहे खरा डुबकी किंग!

Not Pardeep, but this player is the real Dubki King

भारताचा आघाडीचा रेडर परदीप नरवालने आपल्या खेळाने आजवर अनेकांची मने जिंकली आहेत. प्रो कबड्डी लीगमध्ये आठ पॉईंट्सची रेड मारणारा एकमेव खेळाडू, १०००  पॉईंट्स नोंदविणारा पहिला खेळाडू, सर्वाधिक सुपर रेड, सर्वाधिक सुपर १० असे अनेक विक्रम आपल्या नावावर करत त्याने रेकॉर्ड ब्रेकर हे नाव कमावले आहे.
परदीप एक रेडर म्हणून चाणाक्ष असला तरी त्याच्या डुबकी मारण्याच्या कौशल्याने तो सतत चर्चेत असतो. परदीपसारखी डुबकी मारता आली पाहिजे असे अनेक तरुण खेळाडूंना वाटते.
डुबकीचे तंत्र परदीपने प्रसिद्ध केले असले तरी पहिल्यांदा डुबकीचा वापर परदीपने केला नव्हता. डुबकी तंत्राचा पहिल्यांदा वापर करणारा खेळाडू आहे शब्बीर बापू.  शब्बीर बापूने प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामात या तंत्राचा वापर करत सगळ्यांचे लक्ष वेधुन घेतले होते. दुर्दैवाने सततच्या दुखपतींनी डुबकीचे कौशल्य वापरात आणण्यासाठी त्याच्या शरीराकडून त्याला योग्य ती साथ मिळाली नाही.
नंतरच्या हंगामात परदीपने आपल्या डुबकी तंत्राने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आणि त्याचा भरपूर वापर करायला सुरुवात केली.परदीपने एकामागून एक विक्रम केल्याने साहजिकच त्याला डुबकी किंग अशी उपाधी देण्यात आली. त्यामुळे नकळतपणे शब्बीर बापूचे नाव मागे पडले.परदीपला डुबकी किंग असे म्हटले जाते यात शब्बीर बापूला आनंदच वाटतो.त्याने तसे एका मुलाखतीत सांगितलेसुद्धा होते. शब्बीर बापूने यु मुंबाकडून प्रो कबड्डीचे विजेतेपद मिळवले होते.गेल्या हंगामात तो तमिळ थलायवाज संघाकडून खेळला.