फक्त मॅटवरचाच नाही तर सुरांचाही बाहुबली
Not just on the mat, Siddharth Desai is the Bahubali of music as well

कबड्डी खेळाडू म्हटलं की डोळ्यासमोर येते रांगडी शरीरयष्टी, राकट चेहरा. मॅट हेच आयुष्य असणारे हे खेळाडू मॅटवर नसतानाही आपल्या शरीरयष्टीकडे लक्ष देताना दिसतात.कब्बडी सोडून या खेळाडूंना सहसा व्हिडीओ गेम्स किंवा चित्रपट बघणे यांसारखे छंद असल्याचे पहायला मिळते. महाराष्ट्राचा एक खेळाडू मात्र मॅटवर नसताना चक्क गिटार हातात घेऊन सुरांची आळवणी करतो.तो खेळाडू आहे सिद्धार्थ देसाई.
सिद्धार्थची गायकी त्याच्या चाहत्यांना नवी नाही.
कबड्डीबरोबरच सिध्दार्थने आपली गाण्याची आणि गिटार वाजविण्याची आवड देखील जोपासली आहे हे विशेष. वेळीवेळी तो इन्स्टाग्रामवर आपल्या गाण्याचे व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असतो.चाहत्यांनासुद्धा ते विशेष आवडतात हे त्यावरील कॉमेंट्सवरून लक्षात येते.
सध्या करोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये वेळ घालवण्यासाठी बरेच खेळाडू वेगवेगळे मार्ग अवलंबताना दिसत आहेत. सिध्दार्थला मात्र यासाठी फारसे परिश्रम घेण्याची गरज दिसत नाही. गेल्या काही दिवसांत सिध्दार्थने आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्या गिटार वादनाचे आणि गायकीचे काही व्हिडीओज शेअर केले आहेत. यात तारे जमीन पर चित्रपटातील माँ, तेरे बिन नाही लगदा दिल मेरा, दिल दिया गल्ला या हिंदी गाण्यांबरोबरच अगं बाई अरेच्या चित्रपटातील मायेच्या हळव्या अशा गाण्यांचा समावेश आहे. एरवी सिद्धार्थ त्याच्या मजबूत शरीरयष्टीसाठी ओळखला जातो. त्याच्या व्यायामाच्या व्हिडीओजचासुद्धा एक चाहता वर्ग आहे. असे असताना गायनासारखी आपली दुसरी बाजू चाहत्यांसमोर आणून सिध्दार्थने सर्वांनाच एक सुखद धक्का दिला आहे.
सिध्दार्थने प्रोकबड्डी लीगच्या सहाव्या हंगामात यू मुंबाकडून पदार्पण केले होते. सातव्या हंगामात १.४५ कोटी रुपयांची बोली लावत तेलगू टायटन्स संघाने त्याला आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतले.