प्रो कबड्डी लीग सुरु करण्याची घाई नको – चारू शर्मा 

No need to rush to start Pro Kabaddi League - Charu Sharma

करोना व्हायरसमुळे यावर्षीच्या अनेक क्रीडास्पर्धा रद्द करण्यात आल्या किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. भारतातील अतिशय प्रसिद्ध प्रो कबड्डी लीग याला अपवाद नाही. सध्याच्या परिस्थिती प्रो कबड्डी लीगचा नवा हंगाम कधी याची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. प्रो कबड्डी लीगचे संस्थापक चारू शर्मा यांनी एशियानेट न्यूजशी बोलताना याबद्दल बोलताना प्रो कबड्डीच्या नव्या हंगामाबाबत भाष्य केले.

यावेळी बोलताना शर्मा म्हणाले,
“सध्या परिस्थितीत भारतातील क्रीडाक्षेत्राबाबत कुणालाच फारशी माहिती नाही. ज्या खेळात खेळाडूंचा एकमेकांशी संपर्क येत नाही अशा खेळांचा सराव सुरु झाल्याचे समजते आहे. कबड्डी खेळात खेळाडूंचा एकमेकांशी सतत संपर्क येत असतो.यामुळे स्पर्धांच्या आयोजकांना प्रचंड काळजी घ्यावी लागेल. खेळाडू घरच्या घरी सराव करून फिट रहात आहेत. मात्र स्पर्धांच्या बाबतीत आपल्याला खूप संयम दाखवावा लागेल.”
प्रो कबड्डी लीग सुरु करण्यासाठी घाई करण्याचे काहीच कारण नाही असे सांगताना शर्मा म्हणाले,
“अगदी वाईटातल्या वाईट परिस्थितीत यावर्षीचा हंगाम झाला नाही तरी पुढच्या वर्षी अधिक जोमाने सुरुवात करता येईल. घाई करत लीग सुरु करणे आपल्याच अंगलट येऊ शकते. आपल्याला देशाबाबत विचार करणे गरजेचे आहे. आपण संयम दाखवत योग्य ती पावले टाकणे गरजेचे आहे. आपण असे केले, सगळे निकष पूर्ण केले आणि सरकारनेही परवानगी दिली तरी पुन्हा एकदा लीग सुरु होऊ शकते. त्यासाठी सरकारच्या नियमांच्या विरोधात जाण्यात काही अर्थ नाही.”
शर्मा यांच्या या वक्तव्यामुळे प्रो कबड्डी लीगच्या यावर्षीच्या हंगामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.