नवा हंगाम, प्रतिस्पर्धी खेळाडू , कर्णधारपद आणि बरंच काही – नवीन कुमारची खास मुलाखत

प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम लवकरच सुरु होणार आहे, या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव महिन्याअखेरीस पार पडणार आहे. त्याआधी प्रत्येक संघाने आगामी आठव्या हंगामासाठी काही निवडक खेळाडू आपल्याकडे कायम ठेवले. प्रो कबड्डी लीगमधील संघ दबंग दिल्लीने त्यांचा स्टार खेळाडू आणि गेल्या दोन हंगामात मोठी कामगिरी केलेला नवीन कुमार गोयत याला आपल्या संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर खेल कबड्डी टीमने नवीनबरोबर संवाद साधला. 


खेल कबड्डी – नवीन, सर्वप्रथम दबंग दिल्ली संघाने तुला कायम ठेवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. 
नवीन – धन्यवाद. 

खेल कबड्डी – दबंग दिल्ली संघ व्यवस्थापनाने तुला संघात कायम ठेवून तुझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यावर तुझी काय प्रतिक्रिया आहे?
नवीन – ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. ज्या संघातून माझा प्रो कबड्डी लीगचा प्रवास सुरु झाला त्याच संघाने मला आपल्या ताफ्यात कायम ठेवणे ही मोठी गोष्ट आहे. दबंग दिल्ली संघ व्यवस्थापन, संघ, सगळे प्रशिक्षक या सगळ्यांचे एकमेकांसोबत चांगले सूर जुळलेले आहेत. अशा संघाचा भाग होणे ही एक चांगली भावना आहे. दिल्लीच्या संघाला गेल्या हंगामात थोडक्यात हार पत्करावी लागली होती. आता त्यामुळे कुठेतरी त्याच संघासोबत पुन्हा एकदा आपण अंतिम सामना खेळावा अशी भावना माझ्या मनात होती आणि संघाने मला कायम ठेवल्याने मला आनंदच झाला आहे. 

खेल कबड्डी – सहाव्या हंगामात तुझी कामगिरी चांगली होती आणि सातव्या हंगामात तर तू त्याहीपेक्षा चांगली कामगिरी केलीस. मग या हंगामात संघाचा एक स्टार खेळाडू  म्हणून संघासाठी तुझी काय योजना आहे?
नवीन – खेळात हारजीत सुरु असते. मात्र कोणत्याही संघाला आपण हरावे असे बिलकुल वाटत नाही. मात्र आता संघात नवे खेळाडूसुद्धा येतील आणि त्यातून संघबांधणी होईल. त्यामुळे संघ कसा असेल यावर आम्ही आमची योजना ठरवू. सध्यातरी आम्ही फिट राहण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्यावेळी केलेली कामगिरी सुधारण्यावरच आमचा भर असेल. 

खेल कबड्डी – आठव्या हंगामासाठी तू स्वतः कशी तयारी करतो आहेस? तुझ्या फिटनेसच्या तयारीबद्दल फॅन्सला काय सांगशील?
नवीन – फिटनेस असणे आणि तो राखणे खूपच महत्वाचे आहे.  मग तो फिजिकल फिटनेस असो वा मेंटल फिटनेस. या दोन्हींची खेळाडूंना खूप गरज असते. याबरोबरच चांगला डाएट असणेही तितकेच महत्वाचे आहे. सध्यातरी मी यावर लक्ष देत आहे. जेव्हा संघाचा कॅम्प लागेल तेव्हा मी यावर आणखी मेहनत घेईन. कॅम्पमधले वातावरण वेगळे असते. तिथला सरावसुद्धा वेगळ्या प्रकारचा असतो. याबरोबरच सध्या कोव्हीडमुळे इतर कुठे वावरताना काळजी घ्यावी लागते आहे, प्रोटोकॉल्स पाळावे लागत आहेत. मी त्यावरसुद्धा लक्ष देत आहे. 

खेल कबड्डी – कोव्हीडचा सर्वात जास्त फटका कबड्डी खेळाला बसला. यामुळे कबड्डी खेळाडूंना सामन्याचा सराव मिळालेला नाही. इतर खेळांमध्ये जेव्हा खेळाडू बऱ्याच काळानंतर सामने खेळायला मैदानावर उतरले तेव्हा त्यातल्या अनेकांना दुखापतीचा सामना करावा लागला. तुला अशी दुखापत होऊ नये म्हणून तू काय खास काळजी घेतो आहेस?
नवीन – दुखापत कुणालाही आणि कधीही होऊ शकते. मात्र तुम्ही फिटनेस आणि डाएटवर लक्ष दिले तर दुखापतीची शक्यता कमी करू शकता. कबड्डी खेळात प्रत्येक वेळी पूर्ण संघच असला पाहिजे अशी गरज नाही. एकटा खेळाडूसुद्धा स्वतःच्या फिटनेसवर सहज लक्ष देऊ शकतो. एखादा खेळाडू रेडर  असेल तर तो त्याच्या मुव्हमेंटवर मेहनत घेऊ शकतो, डिफेंडर असेल तर तो एकटा आपल्या स्किल्सवर मेहनत घेऊ शकतो. याबरोबर जिमला तर सगळेच जात आहेत. त्यामुळे फक्त आपला आहे तो फिटनेस राखणे हे गरजेचे होते. 

खेल कबड्डी – एप्रिलमध्ये झालेल्या सिनियर नॅशनल स्पर्धेत आणि त्याआधी मध्य प्रदेशातील एका स्पर्धेत तू खेळला होतास. या दोन्ही स्पर्धांमध्ये तुझी कामगिरी खूप चांगली झाली होती. आता फॅन्सची अपेक्षा असेल की नवीनची हीच कामगिरी पहायला मिळेल. त्यांना ही कामगिरी पहायला मिळेल का?
नवीन – फॅन्सचे माझ्यासाठी सदिच्छा असतील, आशीर्वाद असतील, भरवसा असेल तर मी नक्कीच ही कामगिरी पुन्हा करून दाखवू शकेन. त्यांचा माझ्यावर असलेला भरवसा मी सार्थ ठरवेन. फॅन्सचे समर्थन ही माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. वेळ पडली तर मी दुप्पट मेहनत घेईन पण फॅन्सला नाराज करणार नाही. 

खेल कबड्डी – इतर संघ तुझे जुने व्हिडीओ बघून तुझ्याविरुद्ध योजना आखतील. त्यासाठी तू तुझ्या बाजूने कशी तयारी करशील?
नवीन – ते जसे माझे व्हिडीओ बघतात तसेच आमचा संघही त्यांचे व्हिडीओ बघत असतो. एखाद्या संघाविरुद्ध माझा टॅकल होत असेल तर तो कसा झाला आहे हे आम्हाला कळू शकेल. जसे मुंबईचा फझल रेडरला पाठीमागून चपळाईने टॅकल करतो किंवा इतर कोणी डिफेंडर टॅकल करताना कसा येतो हे आम्ही शोधू. 

खेल कबड्डी – गेल्या हंगामापर्यंत चंद्रन रणजितने तुझा सपोर्ट रेडर म्हणून चांगली कामगिरी होती. आता तो संघात नसेल. मग या हंगामात चंद्रनची जबाबदारी कोण घेईल असे तुला वाटते?
नवीन – सध्या आमच्या संघात विजय हा एक चांगला ऑल राउंडर आहे. त्याने दिल्लीआधी पटना संघासोबत चांगली कामगिरी केली होती. याशिवाय आमच्या नव्या दमाचा रेडर नीरज नरवालसुद्धा आहे. त्याने स्वतःवर बरीच मेहनत घेतली आहे. या दोघांवर माझा विश्वास आहे. यानंतर लिलाव पार पडल्यानंतरसुद्धा संघात काही चांगले खेळाडू येतील. त्यांचीही मदत होईल. 

खेल कबड्डी – गेल्या दोन हंगामात तुझी कामगिरी चांगली झाली आहे. प्रो कबड्डी सोडून इतर स्पर्धांतसुद्धा तू उत्तम खेळला आहेस. तुझ्या कामगिरीच्या आधारवर संघ व्यवस्थापनाने तुझ्याकडे कर्णधारपदाची धुरा द्यायचे ठरवले तर त्यासाठी तू तयार आहेस का?
नवीन – कर्णधारपदाची जबाबदारी घेण्यासाठी अनुभवाचीसुद्धा गरज असते. मात्र संघ व्यवस्थापनाने असा निर्णय घेतला तर त्यासाठी मी तयार आहे. संघासाठी मी हि जबाबदारी घेण्यास तयार आहे. कर्णधारपद जेव्हा मी स्वीकारेल तेव्हाच मी शिकू शकेन की यासाठी नक्की काय करण्याची गरज असते. त्या त्या वेळेस मैदानात कशी परिस्थिती असेल यावर अवलंबून मी ठरवेन. 

खेल कबड्डी – कर्णधारपदाची जबाबदारी पडल्यावर काही खेळाडूंची स्वतःची कामगिरी खालावते. असे काही झाले तर?
नवीन – नक्कीच. खेळाडूवर कर्णधारपदाचा परिणाम होतोच. मी तर या क्षेत्रात नवीन आहे. खेळातले हे चढउतार चालू असतात. मात्र संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षक यांच्या पाठबळावर मी चांगली कामगिरी करू शकेन. 

खेल कबड्डी – तू फक्त दिल्लीच नाही तर भारतातील एक आघाडीचा कबड्डीपटू बनला आहेस. जिथे जाशील तिथे तुला फॅन्सचे प्रेम मिळताना दिसते. याबद्दल काय सांगशील?
नवीन – अर्थात याचा मला अभिमानच वाटतो. मी कुठे गेलो तर “हा भारतासाठी कबड्डी खेळतो.” असे जेव्हा फॅन्स म्हणतात तेव्हा निश्चितच आनंद होतो. माझे वडील कुठे गेले तर त्यांना “हे नवीनचे वडील आहेत.” असे म्हणून सन्मान मिळतो. याचा मला खूप अभिमान वाटतो. 

खेल कबड्डी – प्रो कबड्डी लीगच्या येणाऱ्या हंगामात तुझी स्पर्धा कोणत्या रेडरसोबत असेल असे तुला वाटते?
नवीन – पवन कुमार सेहरावत

नवीन कुमार गोयत
हंगाम ६ मध्ये पदार्पण

हंगाम ६ – २२ सामने १७७ गुण
हंगाम ७ – २३ सामने ३०३ गुण
२२ सुपर १०
नॉट आउट टक्केवारी ८५.१५ %