एम डी कॉलेजकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

सबंध देशावर सध्या करोनाचे संकट आहे. यातही महाराष्ट्रातील परिस्थिती अधिक गंभीर आहे. शासनाकडून विविध पातळ्यांवर करोनाशी लढा देण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून शासनाकडून नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईमधील एम. डी. कॉलेजच्या आजी माजी कबड्डी खेळाडूंनी कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये आपला खारीचा वाटा उचलला आहे. या सर्व आजी माजी कबड्डी खेळाडूंच्या वतीने १,२१,१२१ रुपयांचा डिमांड ड्राफ्ट मुख्यमंत्री सहाय्यता निधिकरिता मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी या खेळाडूंच्या वतीने पराग सुर्वे, संदिप काणेकर, अपेक्षा टाकळे उपस्थित होते.
एम. डी. कॉलेजचे प्रशिक्षक व शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री राजेश पाडावे यांनी आपल्या सर्व आजी माजी कबड्डी खेळाडूंना सदर निधी जमा करण्याकरिता आवाहन केले होते. त्यानुसार अनेक आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय, विद्यापीठ स्तरावरील एकूण ९७ कबड्डी खेळाडूंनी आपापल्या परीने खारीचा वाटा उचलून सदर मदत निधी उभा केला.
या खेळाडूंमध्ये प्रो कबड्डीचे विशाल माने, रिशांक देवाडिगा, नितीन मोरे, पंकज मोहिते, अजिंक्य कापरे यांच्यासह मुंबई उपनगरच्या जिल्हा क्रिडा अधिकारी सुवर्णा बारटक्के-पालव तसेच आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू मेघाली कोरगावकर-म्हसकर या नामांकित खेळाडूंचा समावेश आहे. त्याचप्रमाणे प्रमोद साळुंखे, सचिन कासारे, सागर परब, रक्षा नारकर, मिलिंद कोलते, संतोष खोले, पौर्णिमा जेधे, सुधीर वरखडे, रेखा सावंत, जयश्री सुवर्णा साटम, राजश्री पवार, पूजा यादव, संजय सरवणकर या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा खेळलेल्या खेळाडूंनी सदर निधी उभा करण्यासाठी आर्थिक हातभार लावला.