करोनामध्ये महेंद्र राजपूतला मिळाली चांगली बातमी!

Mahendra Rajput gets a piece of good news amidst Corona

करोनामुळे सध्या अनेक कबड्डी स्पर्धा रद्द होत आहेत. अशात सरकारी नोकरीत असलेले कबड्डी खेळाडू मात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. अशाच एका कबड्डी खेळाडूला नुकतीच चांगली बातमी मिळाली आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या राज्य राखीव पोलीस (SRPF) सेवेत असलेला महेंद्र राजपूत याला नुकतीच नोकरीत बढती मिळाली आहे. महेंद्रने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आपल्या चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे. महेंद्रला कॉन्स्टेबल पदावरून पोलीस नाईक पदावर बढती मिळाली आहे.

 

महेंद्र गेली दहा वर्षे महाराष्ट्रातील धुळे येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या सहाव्या गटात कार्यरत आहे. प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या हंगामापासून महेंद्र या स्पर्धेचा भाग होता. पहिले चार हंगाम बंगाल वॉरियर्सकडून खेळल्यानंतर पाचवा आणि सहावा हंगाम तो गुजरातकडून खेळला.

गुजरातकडून खेळलेला पाचवा हंगाम त्याच्यासाठी सर्वोत्तम ठरला. या हंगामात त्याने १७ सामन्यांत ६२ गुणांची कमाई केली.मात्र सहाव्या हंगामात झालेल्या दुखापतीमुळे त्याला सातव्या हंगामास मुकावे लागले. महेंद्रने वेळोवेळी एक बदली खेळाडू म्हणून आपल्या संघांसाठी लक्षवेधक कामगिरी केलेली आहे. सहाव्या हंगामात यू मुंबाविरुद्ध त्याने केलेली ७ गुणांची चढाई चांगलीच चर्चेत आली होती.

 

“आता दुखापतीतून पूर्णपणे सावरलो आहे आणि प्रो कबड्डीत पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. लॉकडाऊनमध्ये घरीच राहून माझ्या फिटनेसवर मेहनत घेत आहे. प्रो कबड्डीमधील काही संघांनी आगामी हंगामासाठी आपल्याकडून खेळण्यासाठी मला विचारणा केली आहे. गुजरातकडून खेळताना प्रशिक्षक मनप्रित सिंग यांनी माझ्या क्षमतेचा चांगला वापर करून घेतला होता. त्यामुळे पुन्हा या संघाकडून खेळायला नक्कीच आवडेल.” असे महेंद्रने खेल कबड्डीशी बोलताना सांगितले.

 

यावर्षी हरयाणा येथे पार पडलेल्या पोलीस दलाच्या राष्ट्रीय स्पर्धेत तो महाराष्ट्र पोलिसांकडून खेळला. महाराष्ट्र पोलिसांचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला तरी महेंद्रने आपल्या खेळाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. प्रो कबड्डीच्या आगामी हंगामात कोणता संघ महेंद्रला आपल्या ताफ्यात समाविष्ट करतो याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.