कबड्डीलासुद्धा करोनाचा फटका – कबड्डी दिन साधेपणाने साजरा होणार 

Kabaddi hit by Corona as well - Simple celebration on cards for Kabaddi Day 

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेकडून  ‘कबड्डीमहर्षी’ शंकराव साळवी म्हणजेच बुवा साळवी यांचा जन्मदिवस दरवर्षी ‘कबड्डी दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेशी संलग्न असलेल्या जिल्हा कबड्डी संघटनादेखील गेल्या २० वर्षांपासून या हा दिवस साजरा करत आल्या आहेत. यंदा मात्र राज्यात पसरलेल्या करोनाच्या साथीमुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा कायर्क्रम साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
कबड्डी दिनाच्या दिवशी म्हणजे १५ जुलै रोजी मुंबईमध्ये  छत्रपती शिवाजी मैदान, दादर येथील राज्य कबड्डी संघटनेच्या कार्यालयात हा कार्यक्रम साजरा करण्यात येईल. यावेळी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष व उपनगर कबड्डी संघटनेचे माजी अध्यक्ष मा. खासदार गजानन कीर्तिकर यांच्या शुभहस्ते बुवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात येईल. मुंबईमधील तसेच सर्व संलग्न जिल्हा संघटनांनीदेखील  आपापल्या जिल्ह्यात, तालुक्यात ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी शासनाच्या आदेशाचे पालन करून हा ‘कबड्डी दिन’ साजरा करून बुवांच्या कार्याला मानवंदना द्यावी असे आवाहन राज्य संघटनेचे सचिव आस्वाद पाटील यांनी पत्रकाद्वारे जिल्हा संघटनांना केले आहे.