कबड्डी खेळण्यापेक्षा प्रशिक्षक असणे जास्त अवघड – अनुप कुमार

It Is More Difficult To Be A Coach Than To Play Kabaddi says Anup Kumar

प्रो कबड्डी लिगमधील पुणेरी पलटण संघाचा प्रशिक्षक अनुप कुमार याने कबड्डी खेळण्यापेक्षा कबड्डीचा प्रशिक्षक असणे जास्त अवघड आहे असे म्हटले आहे.अनुप प्रो कबड्डी लीगने आयोजित केलेल्या बियाँड द मॅट या इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये बोलत होता.

यावेळी खेळाडू असणे आणि प्रशिक्षक असणे यात नक्की काय फरक आहे? असा प्रश्न एका चाहत्याने अनुपला विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना अनुप म्हणाला,

“खेळाडू म्हणून मॅटवर खेळण्यापेक्षा प्रशिक्षक म्हणून मॅटच्या बाहेर बसणे बरेच अवघड आहे.खेळाडू मॅटवर आपल्याला हवे तसे खेळतो.प्रशिक्षकाला मात्र खेळाडू, संघ,सामन्याचा निकाल,गुणतालिका या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवावे लागते. संघातील प्रत्येक खेळाडूच्या स्वभावानुसार त्याला समजून घ्यावे लागते.सर्वांना एकत्र घेऊन एक कुटुंब म्हणून वागवणे यासारख्या जबाबदाऱ्या प्रशिक्षक म्हणून पार पाडाव्या लागतात.”

“मी एक खेळाडू म्हणून माझ्या संघांसाठी, माझ्या देशासाठी ठीकठाक खेळलो.आता प्रशिक्षक म्हणून मला आपला ठसा उमटवायचा आहे जेणेकरून लोक म्हणतील, “अनुप चांगला खेळाडू तर होताच पण चांगला प्रशिक्षकसुद्धा आहे.”प्रशिक्षक म्हणून माझ्या पहिल्या हंगामात मी बरेच काही शिकलो.अजून बरेच काही शिकायचे आहे आणि करायचे आहे.”

अनुपच्या मार्गदर्शनाखाली पुणेरी पलटण २२ पैकी केवळ ७ सामने जिंकू शकले तर तीन सामन्यांत त्यांची बरोबरी झाली. संघाच्या कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे पलटण गुणतालिकेत १० व्या क्रमांकावर राहिले. अर्थात अनुपचे हे पहिलेच वर्ष असल्याने त्याला प्रशिक्षक म्हणून स्वतःला सिद्ध करायला अजून वेळ आहे.