चांगला खेळाडू बनायचे असेल तर मनप्रीत सांगतो काय सांगतो ऐका 

If you want to be a good player, listen to what Manpreet has to say

कुठल्याही खेळाडूला आपण पुढे जाऊन भारतासाठी खेळावे, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधीत्व करावे अशी इच्छा असते. यासाठी काहीजण प्रचंड कष्ट घेतात तर काहीजण दुर्दैवाने चुकीचा मार्ग निवडतात. यामध्ये बऱ्याचदा तरुण खेळाडूंचा समावेश असतो. अशा नवख्या आणि तरुण खेळाडूंसाठी गुजरात फॉर्च्युन जायंट्सचा प्रशिक्षक मनप्रीत सिंगने कानमंत्र दिला आहे. तो प्रो कबड्डी लीगच्या इंस्टाग्राम हँडलवरून आयोजित ‘बियॉंड द मॅट’ या लाईव्ह सत्रात बोलत होता.

यावेळी बोलताना मनप्रीतने सांगितले,

“तरुण खेळाडूंनी कबड्डी खेळण्यास सुरुवात केल्यावर सिनियर खेळाडूंच्या स्टाईलकडे लक्ष न देता त्यांच्या खेळण्याकडे लक्ष दिले पाहिजे. ते कसे खेळतात, कशी रेड करतात याकडे लक्ष देऊन आपल्याला तसे खेळण्यासाठी काय करावे लागेल हे शिकले पाहिजे. कबड्डी खेळायला सुरुवात करताना बरेच तरुण आपल्या घरीच रहात असतात. घरी असल्यामुळे त्यांना पौष्टिक आहार मिळू शकतो. त्यामुळे घरच्या आहारावर भर देऊन प्रोटिन, सप्लिमेंट्स यांचा वापर करू नये.  जेव्हा तुम्ही घरापासून दूर असता त्यावेळी तुम्हाला असा आहार मिळणे अवघड असते. प्रो कबड्डीमधील खेळाडू सतत प्रवास करतात. ते घरापासून दूर असतात. प्रत्येक वेळी त्यांची आहाराची गरज योग्य रीतीने भागवली जाईलच असे नसते. म्हणून ते प्रोटीन आणि सप्लिमेंट्सचा वापर करतात.”
“याबरोबरच तरुण खेळाडूंनी सरावावर भर दिला पाहिजे. तसेच खेळताना दुखापत झाल्यास त्यातून बरे होण्यासाठी पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे. अनेकदा तरुण खेळाडू मॅटवर परतण्याची घाई करतात आणि दुखापत अधिक वाढते. यामुळे त्यांचा तोटाच होतो. त्यामुळे दुखापत पूर्ण बरी झाल्यावरच खेळाडूंनी मॅटवर परतावे.”
मनप्रीत पटना पायरेट्सकडून प्रो कबड्डीचा एक हंगाम खेळला. या हंगामात त्याने पटनाला विजेतेपद मिळवून दिले होते.