कबड्डीत आला नसता तर रोहित ह्या क्षेत्रात करणार होता करिअर
If not Kabaddi, Rohit would have made a career in this field

प्रो कबड्डी लीगच्या तिसऱ्या हंगामात पटना पायरेट्सकडून पदार्पण केलेल्या रोहित कुमारने अल्पावधीतच आपली ओळख निर्माण केली.या हंगामात त्याने पटना पायरेट्सच्या विजयात तर हातभार लावलाच शिवाय मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयरचा किताबही जिंकला होता.
त्यानंतर बंगळुरू बुल्सने रोहितला आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतले. रोहितच्या नेतृत्वाखाली बंगळुरू बुल्सने प्रो कबड्डीच्या सहाव्या हंगामाचे विजेतेपद मिळवले. २०१६ मध्ये पार पडलेल्या दक्षिण आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारतीय संघाचाही तो भाग होता.
कबड्डीत एवढे यश मिळवलेल्या रोहितने एकेकाळी कबड्डी सोडून दुसऱ्या क्षेत्रातही कारकीर्द करण्याचा विचार केला होता. स्वतः रोहितने प्रो कबड्डी लीगद्वारा आयोजित ‘बियॉंड द मॅट’ या कार्यक्रमात याबद्दल माहिती दिली. यावेळी बोलताना रोहित म्हणाला,
“कबड्डीत काही जमले नसते तर मी कदाचित एक अभिनेता बनण्याचा प्रयत्न केला असता.”
आपल्याला लहानपणापासून चित्रपट क्षेत्राचे वेड असल्याचे रोहितने यावेळी सांगितले. रोहित आणि अभिनेता अक्षय कुमार बद्दलचे त्याचे प्रेम सर्वांनाच माहित आहे. प्रो कबड्डीत आल्यावर त्याने वेळोवेळी अक्षय कुमारबद्दलच्या आपल्या प्रेमाबद्दल जाहीर वक्तव्य केले होते. अखेरीस प्रो कबड्डीत खेळू लागल्यावर त्याची आणि अक्षय कुमारची भेट झाली. रोहितने आपल्या हातावर अक्षय कुमारच्या चेहऱ्याचा टॅटूदेखील करून घेतला आहे.