कोचची एक सूचना आणि राहुल बनला खतरनाक रेडर!
How a coach’s suggestion helped develop Rahul Chaudhary’s most lethal Kabaddi move

प्रो कबड्डी लीगमध्ये आपल्या नावावर ९५० हुन अधिक चढाईचे गुण करत राहुल चौधरी ने स्वतःला एक उत्कृष्ट रेडर म्हणून सिद्ध केले आहे. शोमन ह्या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या राहुलची खोलवर रेड करत, झटक्यात आपला वेग वाढवत प्रतिस्पर्धी संघाचा बचाव भेदण्याची क्षमता हे त्याच्या खेळाचे वैशिष्ट्य.
असे असले तरी राहुलचा ‘रनिंग हँड टच’ सर्वाधिक परिणामकारक आहे.स्वतः राहुल अनेकदा या कौशल्याचा वापर करताना दिसतो. प्रो कबड्डीच्या इन्स्टाग्राम हँडलवरून आयोजित ‘बियाँड द मॅट’ या लाईव्ह सेशनमध्ये बोलताना राहुलने आपण रनिंग हँड टचचे कौशल्य कसे आत्मसात केले याविषयी माहिती दिली.
“कबड्डी खेळायला सुरुवात केली तेव्हा मी राईट कॉर्नर म्हणून खेळायचो. त्यावेळी माझी निवड स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया गांधीनगरमध्ये झाली होती.तिथे महिपाल नरवाल, मनप्रित सिंग यांच्यासारखे ज्येष्ठ खेळाडू असल्याने आमच्यासारख्या नवख्या खेळाडूंना खेळण्याची फारशी संधी मिळत नसे.आम्ही मॅटच्या बाजूला बसून फक्त बघत असू.”
महिपालचे रेडींगचे तंत्र बघून राहुलला सुद्धा आपण रेडर बनावे असे वाटले.
“महिपाल हा एक उत्कृष्ट रेडर होता.त्याचे लायन जम्पचे कौशल्य वादातीत होते.तो एक परिपूर्ण खेळाडू होता. त्याचे होणारे कौतुक पाहुन मलासुद्धा रेडर बनण्याची प्रेरणा मिळाली. आपणही काही चांगल्या रेड करून लोकांची वाहवा मिळवू शकू असे वाटले.”
राहुलने संघात स्थान तर मिळवले पण तो सहसा राखीव खेळाडू असे.मात्र हे राखीव खेळाडू असणेच त्याच्या कारकिर्दीला कलाटणी देणारे ठरले.
“जेव्हा तुम्ही राखीव खेळाडू असता तेव्हा तुम्हाला सतत तयारीत असावे लागते.प्रशिक्षक सांगेल त्या क्षणी मैदानावर उतरावे लागते.यासाठी वॉर्म अप म्हणून राखीव खेळाडू मैदानाच्या बाजूला धावत असतात. मी वॉर्म अप म्हणून धावत असताना माझ्या प्रशिक्षकांनी मला रनिंग हँड टच चा सराव करण्याचा सल्ला दिला आणि मीही तो लगेच अमलात आणला.” राहुल सांगत होता.
“रनिंग हँड टचचे कौशल्य आत्मसात केल्यावर माझ्या प्रशिक्षकांनी मला झटक्यात दिशा बदलत प्रतिस्पर्धी संघाला चकित करत गुण कसे घ्यायचे हे शिकवले. तेव्हापासून माझ्यातला राईट कॉर्नर रेडर बनू लागला.त्यानंतर मी कधीच मागे वळून पाहिले नाही.”
राहुलचा रनिंग हँड टच हा सर्वोत्कृष्ट असला तरी आपण या खेळाचे विद्यार्थी आहोत आणि एक रेडर म्हणून यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या कौशल्यात सतत भर घालत राहणे गरजेचे आहे असे राहुलला वाटते.
“आमच्यावेळी प्रतिस्पर्धी संघाच्या बचावाचा अभ्यास करण्यासाठी कोणतेही व्हिडीओ फुटेज नसे.मात्र आता भरपूर व्हिडीओ उपलब्ध असल्याने तरुण खेळाडूंना स्वतःचा खेळ सुधारण्याची भरपूर संधी आहे. खेळाडूदेखील या सुविधांचा वापर करतात हे महत्वाचे आहे.”
“एक रेडर म्हणून यशस्वी व्हायचे असेल किमान ४-५ कौशल्ये तुमच्या भात्यात हवीत. मात्र रनिंग हँड टच, बोनस आणि टर्निंग ही कौशल्ये तुमच्याकडे असतील तर कोणताही प्रतिस्पर्धी संघ तुम्हाला रोखू शकत नाही.” राहुल सांगत होता.