म्हणून मनप्रीतने घटवले तब्बल ६० किलो

Here is why Manpreet lost whopping 60 kg

– नचिकेत धारणकर

प्रो कबड्डीची लोकप्रियता आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पहिल्या हंगामापासूनच प्रचंड प्रसिद्ध झालेल्या या लीगमध्ये खेळण्याची अनेक खेळाडूंची इच्छा असते. भारतातर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डी खेळलेल्या मनप्रीत सिंगला सुद्धा प्रो कबड्डीत खेळण्याचा मोह आवरता आला नाही.मनप्रीतचा प्रो कबड्डीत येण्याचा प्रवास मात्र सोपा नव्हता. त्याला यासाठी स्वतःवर बरीच मेहनत घ्यावी लागली. स्वतः मनप्रीतने याबद्दल माहिती दिली. तो प्रो कबड्डी लीगच्या इंस्टाग्राम हँडलवरून आयोजित ‘बियॉंड द मॅट’ या लाईव्ह सत्रात बोलत होता.

यावेळी बोलताना मनप्रीतने सांगितले,

“प्रो कबड्डीत खेळण्यासाठी मला स्वतःवर बरीच मेहनत घ्यावी लागली.मी एक कबड्डी खेळाडू असलो तरी या लीगमध्ये खेळण्यासाठी खेळण्याची कलाच नाही तर वजनसुद्धा महत्वाचे असते. या लीगमध्ये खेळण्यासाठी खेळाडूचे वजन सुद्धा ८५ किलो पेक्षा कमी पाहिजे असा नियम आहे.”

“ऑगस्ट महिन्यात माझे वजन १३० किलोच्या जवळपास होते. त्यामुळे प्रो कबड्डीमध्ये खेळण्यासाठी मला खूप कमी कालावधीत आपले वजन कमी करावे लागणार होते. हे बरेच अवघड होते. मात्र माझा मुलगासुद्धा प्रो कबड्डीचा खूप मोठा चाहता असल्याने त्याने माझ्याकडे हट्ट केला की तुम्ही सुद्धा प्रो कबड्डी खेळा आणि हाच त्याचा हट्ट माझ्यासाठी प्रेरणादायी ठरला.मी ६ महिने आपल्या वजन आणि फिटनेस वर लक्ष देत तब्बल ४६ किलो वजन कमी केले.मी उत्तर भारतीय असल्याने माझ्या आहारात तूप, दही, दूध यासारखे पदार्थ जास्त होते. त्यामुळे साहजिकच मला जास्त मेहनत करावी लागली. मात्र माझे लक्ष्य आणि मुलाची इच्छा पूर्ण करण्याचा ध्यास ठेवून मी अखेरीस प्रो कबड्डीमध्ये प्रवेश मिळवला.”

मनप्रीत प्रो कबड्डीमध्ये एकच हंगाम खेळला असून त्यात सुद्धा त्याने पटणा पायरेट्सला विजेतेपद मिळवून दिले होते. अंतिम सामन्यात पटणा पायरेटने यु मुंबाचा ३१-२८ असा पराभव केला होता. त्याने एकूण १३ सामने खेळले ज्यात २४ रेड तर ५ टॅकल असे एकूण २९ गुण मिळवले.