खेळाची अजिबात आवड नव्हती, आता झालाय प्रो कबड्डी विजेता
He was never fond of sports, now he is a Pro Kabaddi winner

क्रीडा क्षेत्रात यशस्वी व्हायचे तर आपण जो खेळ खेळतो त्याची आवड असणे खूप महत्वाचे ठरते. या आवडीमुळेच खेळामध्ये प्राविण्य मिळवणे सोपे जाते. या लेखात अशा एका खेळाडूची गोष्ट पाहणार आहोत की ज्याला मुळात खेळाचीच आवड नव्हती. तरीही तो पुढे जाऊन नामांकित कबड्डी खेळाडू बनला आणि आज भारतातील एक आघाडीचा कबड्डीपटू आहे. हा खेळाडू म्हणजे रोहित कुमार. तोच ज्याने पटना पायरेट्स आणि बंगळुरू बुल्सला प्रो कबड्डीचे विजेतेपद मिळवून दिले.
रोहितने नुकताच याबद्दल खुलासा केला. प्रो कबड्डी लीग आयोजित ‘बियॉंड द मॅट’ या कार्यक्रमात बोलताना तो म्हणाला,
“लहान असताना मला खेळात फारशी रुची नव्हती. माझे शाळेतील सिनियर कबड्डी खेळत असत. मात्र भारताचा माजी कर्णधार राकेश कुमार याला खेळताना बघून मला कबड्डी खेळण्याची प्रेरणा मिळाली. माझे वडीलही कबड्डीपटू होते. त्यांनी दिल्ली पोलीस सेवेत काम सुरु केल्यावर त्यांचे कबड्डी खेळणे बंद झाले. मात्र मी कबड्डी खेळावी असे त्यांना वाटे, म्हणून ते मला कबड्डीचे सामने बघायला घेऊन जात. या सामन्यांमध्ये राकेश कुमार, मनजीत सारखे खेळाडू खेळत. आपल्याला राकेशसारखा खेळाडू बनता आले तर उत्तम होईल असे मला तेव्हा वाटे. अशा प्रकारे मी कबड्डी खेळू लागलो.”
“मी फक्त कबड्डीच खेळलो असे नाही. कबड्डीसारख्या सांघिक खेळात भाग घेण्यापेक्षा वैयक्तिक खेळांत भाग घेणे मला जास्त योग्य वाटे. मी १०० मीटर, २०० मीटर, उंच उंडी आणि लांब उडी या खेळातही प्राविण्य मिळवले. मात्र कबड्डी खेळाची मला चांगली जाण होती. शिवाय या खेळात कारकीर्द करण्याचा विचार कर असा सल्ला माझ्या वडिलांनी मला दिला म्हणून मी कबड्डीची निवड केली.”
“लवकरच मी राज्याच्या संघाकडून राष्ट्रीय स्पर्धेत खेळू लागलो. पहिल्यांदा जेव्हा मला किट बॅग मिळाली तेव्हा मला प्रचंड आनंद झाला होता. दिल्लीची जर्सी घालताच आता आपण भारतीय संघाची जर्सीसुद्धा मिळवायची हा विचार माझ्या मनाला शिवला. अर्थातच मी त्यासाठी भरपूर मेहनत घेतली आणि लवकरच भारतीय संघात स्थान मिळवले.”
पुढे जाऊन रोहितने २०१६ च्या दक्षिण आशियाई स्पर्धांमध्ये भारताकडून सुवर्णपदक मिळवले. याबरोबरच त्याने पटना पायरेट्स आणि बंगळुरू बुल्सकडून प्रो कबड्डी लीगचे विजेतेपदही मिळवले.