ज्युनिअर नॅशनल स्पर्धेत न खेळताच पोहोचला प्रो कबड्डीत

हो बरोबर वाचलंत तुम्ही! भारतीय कबड्डी संघात एक खेळाडू असा आहे की जो आजतागायत ज्युनिअर नॅशनल स्पर्धा खेळलेला नाही. केवळ त्याचा खेळ बघून प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामात बंगरुळू बुल्स संघाने त्याला थेट आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतले. हा खेळाडू म्हणजे परदीप नरवाल.नुकत्याच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत परदीपने ही बाब स्पष्ट केली.
हरयाणातील सोनिपत जिल्ह्यातील रिंधना गावात परदीपचा जन्म झाला.लहानपणापासून कबड्डीची गोडी असल्याने परदीप चांगला खेळाडू बनला. अशातच त्याच्या डुबकीने त्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.त्याचा खेळ बघून नुकत्याच सुरू झालेल्या प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामात बंगळुरू बुल्सने त्याला आपल्या संघात घेतले. विशेष म्हणजे बंगरुळू बुल्सने कोणत्याही प्रकारची चाचणी न घेता परदीपला संघात घेतले होते.
प्रो कबड्डीचा दुसरा हंगाम बंगळुरू बुल्सकडून खेळल्यानंतर तिसऱ्या हंगामात परदीप पटणा पायरेट्स संघाकडून खेळू लागला. या संघात एक चढाईपटू म्हणून त्याच्या प्रतिभेला वाव मिळाला.परदीपच्या खेळाच्या जोरावर पटणा पायरेट्स संघाने सलग तीन वेळा प्रो कबड्डी लीगचे विजेतेपद मिळवले.