त्याने कुस्ती सोडली आणि भारताला एक प्रतिभाशाली कबड्डीपटू मिळाला

He quit wrestling and India got a talented Kabaddi player

प्रो कबड्डीतर्फे सुरु करण्यात आलेल्या ‘बियाँड द मॅट’ या कार्यक्रमाचे दुसरे सत्र सध्या सुरु आहे. या सत्रात रविवारी (११ ऑक्टोबर) अष्टपैलू कबड्डीपटू मनजीत चिल्लर उपस्थित होता. प्रो कबड्डी लीगच्या इन्स्टाग्राम हँडलवरून लाईव्ह पार पडलेल्या या कार्यक्रमात त्याने त्याच्या कारकिर्दीतील अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला. यावेळी त्याने तो कुस्ती सोडून कबड्डीकडे कसा वळला हे देखील सांगितले.

दुखापत झाली आणि कुस्ती सुटली;

यावेळी मनजीतने सांगितले की तो कबड्डी खेळण्याआधी कुस्ती खेळत असे. आठवीत असताना राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाला असताना त्याच्या नाकाला दुखापत झाली. नाकावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यातून तो बराही झाला. मात्र बरे झाल्यावर पुन्हा एकदा त्याला शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्याने कुस्ती सोडली आणि कबड्डीकडे आपले लक्ष वळवले.

मनजीतने सांगितले की तो ज्यावेळी कुस्ती खेळत नसायचा तेव्हा गावातच कबड्डी खेळायचा. यातूनच त्याच्या कबड्डी खेळण्याला सुरुवात झाली. त्यावेळी त्याला माहित होते की आशियाई स्पर्धांमध्ये कबड्डी खेळली जाते. त्यामुळे त्याने ठरवलं की इतके चांगले खेळायचे की त्याची निवड देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी झाली पाहिजे.

मनजीतने जे ठरवले होते ते खरे करुनही दाखवले. मनजीतने भारताकडून २०१० आणि २०१४ च्या आशियाई स्पर्धांचे सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच तो २०१६ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचाही भाग राहिला आहे. कबड्डीमधील त्याच्या योगदानासाठी त्याला अर्जून पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.