अनुप कुमारला आदर्श मानणारा गोविंद आता त्याच्याकडेच गिरवणार कबड्डीचे धडे – विशेष मुलाखत

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव २९ ऑगस्ट पासून सुरु झाला. तीन दिवस चालणाऱ्या या लिलावात पहिल्या दिवशी न्यू यंग प्लेयर्स विभागातील खेळाडूंचा लिलाव पार पडला. यामध्ये चार खेळाडूंची प्रो कबड्डी लीगमधील संघानी निवड केली. राजस्थानचा युवा खेळाडू गोविंद गुर्जर याला पुणेरी पलटणने आपल्या संघात समाविष्ट केले. या निमित्ताने गोविंदबरोबर खेल कबड्डी टीमने संवाद साधला.
खेल कबड्डी – गोविंद, सर्वप्रथम प्रो कबड्डी लीगमध्ये तुझी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
गोविंद – धन्यवाद
खेल कबड्डी – एप्रिल महिन्यात अयोध्या येथे झालेल्या सिनियर नॅशनल कबड्डी स्पर्धेत तू राजस्थानकडून खेळला होतास. त्यावेळी तुझी कामगिरी चांगली झाली होती. त्या कामगिरीच्या आधारावर तुला प्रो कबड्डी लीगमध्ये निवड होईल अशी अपेक्षा होती का?
गोविंद – माझी कामगिरी निश्चितच चांगली झाली होती. त्यामुळे साहजिकच मला प्रो कबड्डीमध्ये संधी मिळेल अशी आशा होती. सिनियर नॅशनल स्पर्धेत पहिल्या पाच डिफेंडरमध्ये माझे नाव होते. या स्पर्धेत मी १९ टॅकल पॉईंट्स मिळवले होते. त्यामुळे कुठेतरी हे आकडे मला साथ देतील असे वाटत होते.
खेल कबड्डी – न्यू यंग प्लेयर्स विभागातून तुझी निवड झाली आहे. या उपक्रमांतर्गत भारतभरातून खेळाडू निवडले गेले होते. तबंगलोर येथे त्यांचा कॅम्पपार पडला होता. या कॅम्पसाठी तू गेला होतास का?
गोविंद – मी या कॅम्पला जाऊ शकलो नाही. कॅम्पच्या आधी मी अयोध्येला सिनियर नॅशनल स्पर्धेत खेळण्यासाठी गेलो होतो. तिथून पुन्हा आल्यावर कोव्हीडची दुसरी लाट आल्याने मला कॅम्पला जाणे शक्य झाले नाही.
खेल कबड्डी – तुझ्याबद्दल थोडेसे सांग.
गोविंद – मी राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील शास्त्रीनगरचा रहिवासी आहे. मी सुरुवातीला क्रिकेट खेळत असे. मला क्रिकेटचीच आवड होती. मात्र माझ्या वडिलांनी मला कबड्डीकडे वळण्याचा सल्ला दिला. त्यांचे ऐकून मी २०१५ च्या शेवटी कबड्डी खेळण्यास सुरुवात केली. माझे वडील स्वतः कबड्डी खेळाडू आहेत. याशिवाय माझे मामा राजकुमार गुर्जरसुद्धा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यामुळे कबड्डीचे बाळकडू घरातूनच मिळाले. नंतर २०१८ मध्ये मी पहिल्यांदा राजस्थानकडून ज्युनिअर नॅशनल स्पर्धा खेळलो. या स्पर्धेत मी तामिळनाडू विरुद्धच्या सामन्यात चांगला खेळ केल्याचे आठवते. आमचा संघ मात्र उपउपांत्यपूर्व फेरीत गुजरातकडून पराभूत झाला. त्यानंतर माझी निवड राजस्थानच्या संघात सीनियर स्टेटटूर्नामेंटसाठी झाली. या स्पर्धेत मी टॉप ऑल राऊंडर होतो. याचा फायदा पुढे राजस्थानकडून सीनियर नॅशनल स्पर्धेसाठी संघात निवड होण्यासाठी झाला. याही स्पर्धेत मी १९ टॅकल पॉईंट्स मिळवत चौथ्या क्रमांकाचा डिफेंडर म्हणून पुढे आलो.
खेल कबड्डी – क्रिकेट सोडून कबड्डी खेळताना त्रास झाला का?
गोविंद – आधी सांगितले तसे मी खूप क्रिकेट खेळत असे. दिवस दिवस घरातून बाहेर असे. त्याचवेळी माझ्या वडिलांनी मला क्रिकेटमध्ये पुढे जाऊन कारकीर्द घडवणे अवघड आहे याची जाणीव करून दिली. त्यांचं ऐकून मी कबड्डी खेळायला सुरुवात तर केली. पण सुरुवातीचे काही दिवस मला खूपच विचित्र वाटले. मी कुठे आलो? असा प्रश्न पडू लागला. पण मी मैदानावर जाणे सोडले नाही, खेळत राहिलो.
खेल कबड्डी – शास्त्रीनगरमधून प्रो कबड्डी लीगमध्ये जाणारा तू पहिला खेळाडू ठरला आहेस. याबद्दल काय सांगशील/
गोविंद – आपल्या गावातून असा मान मिळवणे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. काल माझी निवड झाल्यानंतर गावातल्या लोकांनी माझे खूप कौतुक केले.
खेल कबड्डी – तुला घडविण्यात कोणाचा वाटा आहे?
गोविंद – माझे आईवडील तर कायमच माझ्या पाठीशी आहेत. कबड्डीमध्ये माझे सुरुवातीचे कोच राजनारायण शर्मा यांचे मला नेहमी मार्गदर्शन मिळाले. सध्या मी डॉ. दिनेश चौधरी यांच्याकडे सराव करतो.
खेल कबड्डी – कबड्डीमध्ये कुणाला तू आपला आदर्श मानतोस?
गोविंद – अनुप कुमार, राकेश कुमार, अजय ठाकूर
खेल कबड्डी – अनुप कुमारचे नाव तू तुझा आदर्श म्हणून घेतलेस. आता तुला त्याचेच मार्गदर्शन मिळणार आहे. याबद्दल काय वाटते?
गोविंद – मला स्वप्नातही असे वाटले नव्हते की अनुप कुमार माझे कोच असतील. हा माझ्यासाठी एक सुखद धक्का आहे. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळेल.
खेल कबड्डी – सध्या प्रो कबड्डीसाठी कशी तयारी करतो आहेस?
गोविंद – सध्या मी सामान्यांच्या सरावापेक्षा माझ्या स्वतःच्या फिटनेसवर जास्त लक्ष देतो आहे. प्रो कबड्डी लीगचा हंगाम सुरु होण्याआधी कुठल्याही प्रकारची दुखापत होऊ नये यावर लक्ष देतो आहे. यासोबत डाएटसुद्धा पाळतो आहे.
खेल कबड्डी – आता तुझी कबड्डी कारकीर्द सुरु होते आहे? पुढे जाऊन काय लक्ष्य आहे?
गोविंद – इतर सगळ्या खेळाडूंचे जे लक्ष्य असते तेच माझे आहे. मला भारताकडून कबड्डी खेळायची आहे. यासाठी माझे कोच सतत मला मार्गदर्शन करत असतात. याशिवाय राजस्थान कबड्डी असोसिएशनदेखील सतत खेळाडूंना पाठिंबा देत असते. सिनियर नॅशनल स्पर्धेत मी दीपक हुडा बरोबर खेळलो. सुरुवातीला त्यांच्याशी बोलायला मी जरा बुजत असे. मात्र त्यांनी स्वतःहून आम्हाला पाठिंबा दिला. वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असतात.
खेल कबड्डी – येणाऱ्या प्रो कबड्डी हंगामासाठी तुला टीम खेल कबड्डीकडून खूप खूप शुभेच्छा.
गोविंद – धन्यवाद.