कबड्डी चाहत्यांना खुशखबर – या राज्यात होतेय कबड्डी स्पर्धा
Good news for Kabaddi fans - This state to host Kabaddi tournament

करोनामुळे सध्या सगळ्याच क्रीडास्पर्धा लांबणीवर पडल्या आहेत. कबड्डीसारख्या खेळात खेळाडू सतत एकमेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे प्रो कबड्डी लीगपासून भारतातील सगळ्याच छोट्या मोठ्या कबड्डी स्पर्धा लांबणीवर पडल्या आहेत. असे असले तरी कबड्डी खेळाडू घरी राहूनच आपला फिटनेस राखण्यावर भर देत आहेत. मात्र आता सरकारकडून विविध खेळांवर असलेली बंधने हटविण्यास सुरुवात होत आहे. याचाच आधार घेऊन पंजाब विद्यापीठाच्या क्रीडा विभागाने आंतर महाविद्यालयीन क्रीडास्पर्धा घेण्याचे ठरवले आहे.
दैनिक जागरण ने दिलेल्या वृत्तानुसार, पंजाब विद्यापीठाकडून नोव्हेंबर २०२० मध्ये आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. मात्र असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी (AIU) असून उत्तर विभाग तसेच राष्ट्रीय पातळीवरील विद्यापीठ स्पर्धांसाठी कोणताही कार्यक्रम जाहीर केलेला नाही
Related Posts
पंजाब विद्यापीठाकडून आंतर महाविद्यालयीन स्पर्धांसाठी बनविलेल्या कार्यक्रमानुसार पुरुष आणि महिलांच्या ए डिव्हिजनच्या स्पर्धा आधी पार पडतील. याअंतर्गत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जलतरण, डायव्हिंग आणि वॉटरपोलोचे आयोजन करण्यात येईल. याबरोबरच तिरंदाजी, बॅडमिंटन आणि बेसबॉलचेदेखील आयोजन करण्यात येईल. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बास्केटबॉल, बॉक्सिंग, ब्रिज, कयाकिंग , क्रिकेट, फुटबॉल, शूटिंग, सॉफ्ट टेनिस, टेबल टेनिस या स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल.
नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात टेनिस, व्हॉलीबॉल तर चौथ्या आठवड्यात जुडो आणि कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. बी आणि सी डिव्हिजनच्या स्पर्धा नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुरु होतील. यामध्ये सर्कल कबड्डीचा समावेश असून या स्पर्धा डिसेंबर महिन्यात सुरु होतील.
पंजाब विद्यापीठाचे क्रीडा संचालक परमिंदर सिंग अहलुवालिया यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “पंजाब सरकार द्वारे जारी करण्यात आलेल्या नियमांचे पालन करून ह्या स्पर्धा आयोजित करण्यात येतील. या आंतर महाविद्यालयीन स्पर्धाना केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे. या स्पर्धांची तयारी करण्यास लागणारा वेळ लक्षात घेऊन आम्ही नोव्हेंबर महिना निवडला आहे. बाकी स्पर्धासुद्धा या स्पर्धांचे वेळापत्रक बघून आयोजित केल्या जातील.”