भारतीय कबड्डीच्या भविष्याची चिंता आता मिटली
Future of Indian Kabaddi is now in safe hands

कबड्डी जगतात भारताचे वर्चस्व सर्वश्रुत आहे. मात्र गेल्या काही वर्षांत इराण, दक्षिण कोरिया सारख्या देशांनी भारताच्या वर्चस्वाला धक्का दिला आहे. यामुळेच आता कबड्डीची भावी पिढी घडविण्याकडे भारतीय कबड्डी महासंघाने लक्ष देण्याचे ठरवले आहे.
याचाच एक भाग म्हणून महासंघाने एक अनोखी कल्पना राबविण्याचे ठरवले आहे. भारतीय कबड्डी महासंघाने वरिष्ठ आणि कनिष्ठ गटांच्या पुरुष, महिला संघासाठी खेळाडूंची यादी नुकतीच जाहीर केली. या खेळाडूंचे सराव शिबिर महासंघाने आयोजित केले आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हे सराव शिबिर ऑनलाइन पार पडणार आहे.
या सराव शिबिरात भारतीय कबड्डीचा माजी कर्णधार अजय ठाकूर आणि सध्याचा कर्णधार दीपक हुडा यांना प्रशिक्षक पदाची जबादारी देण्यात आली आहे.कनिष्ठ गटातील मुलींच्या दोन गटांचे प्रशिक्षक म्हणून अजय आणि दीपक काम पाहणार आहेत. हे सराव शिबिर २४,२६,२९ आणि ३० सप्टेंबर रोजी दुपारी २ ते २:४० दरम्यान पार पडणार आहे. कनिष्ठ गटातील खेळाडूंना अजय आणि दीपक सारख्या नामांकित खेळाडूंकडून प्रशिक्षण घेण्याची संधी कबड्डी महासंघाने उपलब्ध करून देऊन एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. अजय आणि दीपक यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवाचा या खेळाडूंना नक्कीच फायदा होणार आहे.