आधी खेळाचा आनंद घ्या, मग त्यातून करियरच्या वाटा शोधा – आंतराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन 

Enjoy the game first, then find a career out of it exclaims International Kabaddi coach Shailaja Jain

कबड्डी खेळाडूंनी आधी मैदानावरील खेळाचा आनंद घ्यायला शिकले पाहिजे. त्यानंतर खेळातून करियरच्या वाटा शोधल्या पाहिजेत. खेळ तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जाऊ शकतो कारण खेळाच्या माध्यमातून आपण जगणे शिकत असतो असे प्रतिपादन आंतराष्ट्रीय कीर्तीच्या कबड्डी प्रशिक्षिका शैलजा जैन यांनी नुकतेच केले. अभिजितदादा कदम कबड्डी संघ आणि डॉ. पतंगराव कदम महिला कबड्डी संघाने आयोजित ऑनलाईन सत्रात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी कबड्डी खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्याशी संवाद साधला.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या,  “खेळाडूंनी लॉकडाऊनमुळे मिळालेल्या विश्रांतीचा चांगला उपयोग करून घेतला पाहिजे. एक कॉन्टॅक्ट स्पोर्ट् असल्याने मैदानावरील कबड्डीला लवकर सुरुवात होईल असे वाटत नाही. त्यामुळे घरी राहूनच आपल्या कौशल्यावर काम केले पाहिजे.  सध्याच्या परिस्थितीमुळे कबड्डी खेळ जगवायचा असल्यास
कबड्डीच्या प्रशिक्षणात कालानुरूप बदल केले पाहिजेत. झूम कॉल सारख्या साधनांचा वापर करून प्रशिक्षण देता येईल. इंटरनेटवरही माहितीचा वापर करून प्रशिक्षक आपल्या खेळाडूंना प्रशिक्षण देऊ शकतात. “
“प्रशिक्षण व स्पर्धा कलावाधीत खेळाडूंनी सतत सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. यासाठी खेळाडूंना तसे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे. खेळाडूंनी आधी खेळाचा आनंद घेऊन मगच त्यातून करियरच्या वाटा शोधल्या पाहिजेत. “
यावेळी बोलताना जैन यांनी इराण महिला कबड्डी संघाला प्रशिक्षण देतानाचे अनुभवदेखील सांगितले. जैन यांनी भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षक म्हणूनही आशियाई स्पर्धांमध्ये काम पाहिले आहे. सध्या त्या नाशिक येथे रचना संस्थेत कबड्डीच्या मुख्य प्रशिक्षिका म्हणून काम पाहतात.