चेरलाथन प्रो कबड्डीमध्ये ७ संघांचं प्रतिनिधित्व करणारा एकमेव खेळाडू, आजपर्यंत या संघांचा राहिला भाग

डिसेंबर २०२१ पासून प्रो कबड्डीच्या ८ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी २९,३० आणि ३१ ऑगस्ट रोजी खेळाडूंचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. या लिलावात ४६ वर्षीय धर्मराज चेरलाथनचाही समावेश होता. यावेळी त्याला जयपूर पिंक पँथर्सने खरेदी केले. त्यामुळे त्याच्या नावावर एक विक्रम झाला आहे.
पीकेएल ८ मध्ये चेरलाथन करणार जयपूरचे प्रतिनिधित्व
दिग्गज डिफेंडर धर्मराज चेरलाथनला पीकेएलच्या ८ व्या हंगामासाठी अभिषेक बच्चन यांची मालकी असलेल्या जयपूर पिंक पँथर्सने खरेदी केले आहे. त्याच्यासाठी २० लाखांची किंमत जयपूरने मोजली. चेरलाथन जयपूरचे पहिल्यांदाच प्रतिनिधित्व करणार आहे. विशेष म्हणजे हा त्याचा प्रो कबड्डीमधील एकूण ७ वा संघ ठरला आहे.
सात संघांचे प्रतिनिधित्व करणारा पहिला खेळाडू
चेरलाथनला जयपूरने खरेदी केल्यानो तो प्रो कबड्डीमध्ये ७ संघांचा भाग होणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. चेरलाथनने यापूर्वी बंगळुरु बुल्स, तेलुगु टायटन्स, पटना पायरेट्स, पुणेरी पलटन, यु मुम्बा आणि हरियाणा स्टिलर्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.
त्याने प्रो कबड्डीमध्ये कारकिर्दीची सुरुवात बंगळुरु बुल्स संघाकडून केली होती. त्याने पहिले दोन हंगाम याच संघाकडून खेळले. तसेच त्याने दुसऱ्या हंगामात ४२ टॅकल पाँइंट्स मिळवत बंगळुरुला अंतिम सामन्यापर्यंत नेण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्यानंतर तो तिसऱ्या हंगामात तेलुगु टायटन्सकडून खेळला.
चौथ्या हंगामात त्याने पटना पायरेट्सने प्रतिनिधित्त्व करण्याबरोबरच या संघाच्या नेतृत्वाची धूरा सांभाळताना संघाला सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवून दिले. पाचव्या हंगामात चेरलाथनने पुणेरी पटलनचे प्रतिनिधित्व केले, तर सहाव्या हंगामात तो यु मुम्बाकडून खेळला. सातव्या हंगामात त्याला हरियाणा स्टिलर्सने कर्णधार केले होते
त्याने प्रो कबड्डीमध्ये आत्तापर्यंत २५९ टॅकल पाँइंट्स मिळवले असून त्याच्या नावावर १२ हाय-फाईव्ह आहेत.