दीपक हुडाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

Deepak Hooda nominated for Arjuna Award

भारत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार दीपक हुडा याची शिफारस करण्यात आली आहे. भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने नियुक्त केलेल्या समितीने एकूण २९ खेळाडूंची या पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.

अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झाल्यावर दैनिक जागरणला दिलेल्या मुलाखतीत दीपक म्हणाला,

“पुरस्कारासाठी शिफारस झाल्याने अर्थातच आनंद झाला आहे. हा एक राष्ट्रीय सन्मान आहे आणि तो मला मिळतोय. भारतासाठी विविध स्पर्धांमध्ये विजेतेपद जिंकण्याचा माझा प्रयत्न असेल.”

दिपकने भारताकडून २०१६ चा विश्वचषक तसेच २०१६ आणि २०१९ च्या दक्षिण आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. दुबईत २०१८ साली झालेल्या दुबई मास्टर्स स्पर्धेतही त्याने भारताकडून सुवर्णपदक मिळवले होते.

दीपकबरोबरच कबड्डी प्रशिक्षक कृष्णकुमार हुडा यांची द्रोणाचार्य पुरस्कार तर मनप्रित सिंग यांची ध्यानचंद पुरस्कारासाठी शिफारस झाली आहे.

दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडादिनी हे पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जातात. यावेळी मात्र हा सोहळा ऑनलाईन पार पडणार असल्याचे क्रीडा मंत्रालयाकडून सांगण्यात आले. माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पुरस्कारप्राप्त खेळाडूंची नावे घोषित करतील.