अनुभवी प्रशिक्षक रवी शेट्टी युवा पलटणचे प्रशिक्षक

पुणे – प्रो कबड्डी लिगमधील संघ पुणेरी पलटणने एक महत्वाची घोषणा केली आहे. युवा पलटण या आपल्या अकादमीमध्ये प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध कबड्डी प्रशिक्षक रवी शेट्टी यांना त्यांनी पाचारण केले आहे.पुणेरी पलटणने आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर याबाबत माहिती दिली आहे.

युवा पलटण ही पुणेरी पलटणची युवा खेळाडूंची अकादमी आहे. या अकादमीमार्फत ते युवा खेळाडूंना कबड्डी प्रशिक्षण पुरवतात. सुरुवातीला स्थानिक पातळीवरील स्पर्धांमध्ये संधी देऊन या खेळाडूंना तयार केले जाई. या स्पर्धांमधून मग निवडक खेळाडूंना पुणेरी पलटण संघाकडून खेळण्याची संधी दिली जाते.

रवी शेट्टी हे गेल्या २० वर्षांहून अधिक काळ राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर कबड्डी प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. त्यांनी मलेशियाच्या संघाला सुद्धा प्रशिक्षण दिले आहे. प्रो कबड्डी लीगमध्ये त्यांनी यु मुंबाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युमुंबाने २०१५ च्या प्रो कबड्डी हंगामाचे विजेतेपद मिळवले होते.