ही गोष्ट करत अनुपने पुन्हा एकदा आपला निस्वार्थीपणा दाखवला
By doing this, Anup once again showed his selflessness

कॅप्टनकुल म्हणून प्रसिद्ध असलेला भारताचा माजी कर्णधार अनुप कुमार याने प्रो कबड्डीच्या सहाव्या हंगामानंतर निवृत्ती घेतली. प्रो कबड्डीत अनुप यू मुंबा आणि जयपूर पिंक पँथर्स या संघाकडून खेळला. यापैकी यू मुंबा संघाकडून त्याने दुसऱ्या हंगामात विजेतेपद मिळवले. निवृत्तीनंतर लगेचच अनुपने पुणेरी पलटण संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हातात घेतली.
सामन्यातली परिस्थिती कशीही असली तरी अनुप कायम शांतच असे. फक्त आपल्या शांत राहण्याने अनुपने कित्येकदा सामन्याचे पारडे फेडल्याची उदाहरणे आहेत. अनुपचा निस्वार्थीपणासुद्धा अनेकदा चाहत्यांच्या चर्चेचा विषय असतो. अगदी निवृत्त होत असतानाही त्याने आपला निस्वार्थीपणा कायम ठेवला होता.
प्रो कबड्डीच्या सहाव्या हंगामात अनुप जयपूरकडून खेळला. या हंगामात त्याची कामगिरी फारशी चांगली होत नव्हती. स्वतः अनुपला आपण आता पूर्वीसारखे खेळू शकत नाही याची जाणीव झाली होती. अनुप निवृत्त होणार अशा वावड्या मीडियामध्ये उठल्या होत्या. यावेळी अनुप
आपल्या कारकिर्दीतील एका महत्वाच्या वळणावर होता. प्रो कबड्डीत अनुपचे ५९६ गुण झाले होते. त्याने ६०० गुण पूर्ण केले असते तर प्रो कबड्डीत अशी कामगिरी करणारा तो त्यावेळचा फक्त सातवा खेळाडू ठरला असता.
इतर कोणताही खेळाडू असता तर त्याने अजून एक सामना खेळून ६०० गुण पूर्ण करूयात असा विचार केला असता. अनुपने मात्र तसे न करता आपल्या मुलाचा दहावा वाढदिवस ज्या दिवशी आहे त्याच दिवशी निवृत्त होण्याचे ठरवले. आपल्याला ६०० गुण पूर्ण करण्यासाठी फक्त ४ गुणांची आवश्यकता आहे याची कल्पना असूनही त्याने हा निर्णय घेतला. कबड्डीच्या सामन्यात आपले टायमिंग साधणाऱ्या अनुपने निवृत्ती घेतानासुद्धा टायमिंग साधले. इथेही त्याने आपला निस्वार्थीपणा दाखवत भावी कबड्डी खेळाडूंसमोर एक चांगला आदर्श घालून दिला. अशा घटनांमुळे निवृत्त होऊनही आजही अनुप लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतोय.