कबड्डी चाहत्यांसाठी पर्वणी – डिसेंबरमध्ये येतेय नवी वेब सिरीज

Big News For Kabaddi Fans – New Web Series Coming In December

मार्च महिन्यात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे क्रीडा क्षेत्राला मोठा फटका बसला. कबड्डी सारख्या खेळाडू सतत एकमेकांच्या संपर्कात येणाऱ्या खेळाला तर याची खूपच मोठी झळ सोसावी लागली. याचाच परिणाम म्हणून प्रो कबड्डी लीगसारखी भारतातील सर्वाधिक लोकप्रिय कबड्डी स्पर्धा रद्द करण्यात आली. यामुळे कबड्डी चाहत्यांचा हिरमोड झाला असला तरी आता त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे.

कबड्डीच्या चाहत्यांसाठी प्रो कबड्डी लीगमधील संघ जयपूर पिंक पँथर्स एक नविकोरी वेबसिरीज घेऊन येत आहे. या वेब सिरीजचा टिझर नुकताच युट्युबवर प्रसारित करण्यात आला आहे. सन्स ऑफ द सॉइल असे या वेबसिरीजचे नाव असून ती ४ डिसेंबरला अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.

 

या वेबसिरीजमधून जयपूर पिंक पँथर्स संघाचा प्रवास उलगडण्यात येणार आहे असे टिझरवरून वाटते. या संघाने प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद मिळवले होते तर चौथ्या हंगामात हा संघ अंतिम फेरीत पराभूत झाला होता.