प्रो कबड्डीचे स्टार असलेल्या पण भारतासाठी खेळू न शकलेल्या ७ खेळाडूंचा संघ
Best Team Of PKL Players Who Have Not Played For India

सहा वर्षांपूर्वी २०१४ मध्ये भारतात प्रो कबड्डी लीग सुरु झाली. या लीगने अनेक युवा कबड्डीपटूंचे नशीब पालटवून टाकले. भारताच्या विविध प्रदेशांतून आलेल्या या खेळाडूंचे कौशल्य लोकांसमोर आल्याने अनेक खेळाडू रातोरात स्टार बनले. प्रो कबड्डीमुळेच काही खेळाडूंना भारतीय कबड्डी संघाची दारेसुद्धा खुली झाली. असे असले तरी काही खेळाडू असे आहेत की ज्यांनी प्रो कबड्डी लीगमध्ये चांगली कामगिरी करूनही ते अजून भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
प्रो कबड्डीचे स्टार असून भारतीय कबड्डी संघात स्थान न मिळवू शकलेल्या खेळाडूंचा संघ खेल कबड्डीने तयार केला आहे.
१. सिद्धार्थ देसाई (रेडर) – प्रोकबड्डीच्या सहाव्या हंगामात सिद्धार्थने यु मुंबा संघाकडून पदार्पण केले. आपल्या पहिल्याच सामन्यात सुपर १० नोंदवत सिद्धार्थने मोठ्या थाटात आपले आगमन साजरे केले. याच हंगामात केवळ ४ सामन्यांत ५० गुण नोंदवत त्याने विक्रम केला. सिद्धार्थने आपल्या पहिल्या सहापैकी पाच सामन्यांत सुपर १० नोंदवला होता. सहाव्या हंगामातील चांगल्या कामगिरीच्या जोरावर सातव्या हंगामात सिद्धार्थवर तेलगू टायटन्सने तब्बल १. ४५ कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतले. सिद्धार्थ सातव्या हंगामाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. सातव्या हंगामातही सिद्धार्थने दहा सुपर १० च्या मदतीने तब्बल २२० एकूण गुण नोंदवले. सध्या सिद्धार्थ भारतीय रेल्वेकडून खेळतो आहे. प्रोकबड्डी लीगच्या दोन हंगामात उत्तम कामगिरी करूनही सिद्धार्थ अजून भारतीय संघात खेळण्याची प्रतिक्षा करतो आहे.
२. निलेश साळुंके (रेडर) – पुणेरी पलटणकडून तिसऱ्या हंगामात सात सामने खेळल्यानंतर निलेश चौथ्या हंगामात तेलगू टायटन्सकडून खेळू लागला. तेव्हापासुन त्याच्या कामगिरीचा आलेख सतत चढता राहिलेला आहे. प्रो कबड्डीच्या चौथ्या आणि पाचव्या हंगामात राहुल चौधरीपाठोपाठ निलेश तेलगू टायटन्ससाठी दुसरा सर्वोत्कृष्ट चढाईपटू ठरला. पाचव्या हंगामात चढाईचे ९८ गुण नोंदवत त्याने आपली चमक दाखवून दिली. सातव्या हंगामापासून तो जयपूर पिंक पँथर्सकडून खेळत आहे. कल्याणच्या एका गरीब कुटूंबात जन्मलेल्या निलेशने प्रो कबड्डीत आपल्या चांगल्या कामगिरीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. तो महाराष्ट्राकडून २०१८ मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत खेळला. पुण्यात आयकर विभागात नोकरीला असलेला निलेश लवकरच भारतीय संघातून खेळण्याची संधी मिळेल अशी आशा बाळगून आहे.
Related Posts
३. पंकज मोहिते (रेडर)– खेलो इंडियामधील उत्तम कामगिरीने पंकजने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. याच कामगिरीच्या जोरावर त्याला पुणेरी पलटणने आपल्या संघात घेतले. आपल्या पहिल्याच हंगामात चढाईचे ११० गुण नोंदवत पंकजने आपली निवड सार्थ ठरवली. पुणेरी पलटणसाठी हंगाम फारसा चांगला ठरला नाही तरी पंकजच्या रूपात या संघाला नवीन तारा सापडल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. जयपूर येथे मार्च २०२० मध्ये पार पडलेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत ५ सामन्यांत ७५ गुण नोंदवले. कमी कालावधीत एक चांगला चढाईपटू म्हणून नावलौकिक मिळवलेला पंकज आता भारताकडून खेळायची संधी शोधतोय. पंकजचे वय ही त्याची जमेची बाजू आहे. त्यामुळे कामगिरीमध्ये असेच सातत्य ठेवले तर त्याचे भविष्य उज्वल आहे.
४. संदीप धूल (लेफ्ट कॉर्नर) – संदीपने कमी वयात एक उत्कृष्ट लेफ्ट कॉर्नर म्हणून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. प्रो कबड्डीच्या तिसऱ्या आणि चौथ्या हंगामात दबंग दिल्लीकडून अनुक्रमे ३२ आणि ३५ गुण नोंदवत चांगली कामगिरी केली. दिल्लीकडून खेळताना आपल्या सुपर टॅकलने त्याने छाप पाडली होती. काही कारणास्तव संदीपला प्रोकबड्डीच्या पाचव्या हंगामात कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. सहाव्या हंगामात मात्र जयपूर पिंक पँथर्सने ६६ लाखात विकत घेतले. मैदानावर पुनरागमन करताना संदीपने सहाव्या हंगामात २२ सामन्यांत ६७ गुण मिळवले. त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे जयपूर संघाने सातव्या हंगामासाठी त्याला आपल्या संघातच ठेवणे पसंत केले. संघाने आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत संदीपने या हंगामात ७४ गुण नोंदवत आपली कामगिरी उंचावली. संदीपच्या कामगिरीचा चढता आलेख पाहता तो लवकरच भारतीय संघात स्थान मिळवेल यात शंका नाही.
५. बलदेव सिंग (राईट कॉर्नर) – प्रोकबड्डीच्या सातव्या हंगामाचे विजेतेपद मिळवलेल्या बंगाल वॉरियर्स संघाचा एक महत्वाचा घटक म्हणून बलदेव सिंगचे नाव घ्यावे लागेल. रिंकू नरवाल बरोबरची त्याची जोडी या हंगामात चांगलीच लक्षवेधक ठरली. या हंगामात ६७ गुण नोंदवत बलदेवने आपले नाणे खणखणीत वाजवले. यामध्ये पाच सुपर टॅकल आणि ६ हाय फाईव्हजचा समावेश आहे. प्रो कबड्डीच्या दोनच हंगामात चांगली कामगिरी केल्याने बलदेव लवकरच भारतीय संघात स्थान मिळवेल असा विश्वास वाटतो.
६. रण सिंग (लेफ्ट कव्हर) – पंजाबकडून खेळणाऱ्या रणसिंगने प्रोकबड्डीच्या पहिल्या हंगामपासून आपली छाप पाडली. जयपूर पिंक पँथर्सच्या पहिल्या हंगामातील विजयात रण सिंगचा सुद्धा मोठा वाटा होता. प्रो कबड्डीचे पहिले चार हंगाम जयपूरकडून खेळल्यानंतर पाचव्या आणि सहाव्या हंगामात तो बंगाल वॉरियर्सकडून खेळला. पाचव्या हंगामात पकडीचे ५२ गुण नोंदवत त्याने प्रो कबड्डीमधील आपली सर्वात चांगली कामगिरी केली. अँकल होल्ड आणि ब्लॉकवर विशेष पकड असलेला रण सिंग प्रो कबड्डीच्या सातही हंगामात चांगल्या कामगिरीने आपण कमी नसल्याचे सिद्ध करत आला आहे. त्यामुळे आता लवकरच त्याला भारतीय संघात संधी मिळेल अशी आशा करायला हरकत नाही.
७. विकास काळे (राईट कव्हर) – कबड्डी खेळायला काहीशा उशिराने सुरुवात करणाऱ्या विकासने अल्पावधीत आपले कौशल्य सिद्ध केले. प्रो कबड्डीच्या दुसऱ्या हंगामापासून तो बंगाल वॉरियर्स, तेलगू टायटन्स, यू मुंबा, पटना पायरेट्स यासारख्या संघाकडून खेळला आहे. प्रो कबड्डीच्या सहाव्या आणि सातव्या हंगामात प्रत्येकी ३९ गुण नोंदवत त्याने आपली क्षमता सिद्ध केली आहे. महाराष्ट्राकडून २०१७-१८ मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा खेळताना त्याने सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीसाठी महाराष्ट्र शासनाने २०१७-१८ चा शिवछत्रपती पुरस्कार देऊन त्याचा सन्मान केला. आपल्याला लवकरच भारताकडून खेळण्याची संधी मिळेल असा विश्वास विकासला आहे.