सुरुवात केली बदली खेळाडू म्हणून, आता बनलाय खतरनाक रेडर
Began As A Replacement Player, Has Now Become A Deadly Raider

प्रो कबड्डीच्या गेल्या दोन हंगामांमध्ये मध्ये आपल्या तूफान खेळाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा खेळाडू म्हणून पवनकुमार सेहरावतचे नाव घेतले जाते. पवनने प्रो कबड्डीच्या सहाव्या हंगामात मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयरचा किताबही जिंकला होता. आपल्या आयुष्यात कबड्डीने नेमका कसा प्रवेश केला याबद्दल नुकताच पवनने खुलासा केला. तो प्रो कबड्डी लीगच्या इंस्टाग्राम हँडलवरून आयोजित ‘बियॉंड द मॅट’ या लाईव्ह सत्रात बोलत होता.
यावेळीबोलताना पवन म्हणाला,
“साधारण दहा बारा वर्षांपूर्वी मी शाळेत असताना कबड्डी खेळायला सुरुवात केली. त्यावेळी माझी तब्येत चांगली होती. माझे वजनसुद्धा जरा जास्तच होते. त्यावेळी कबड्डीच्या स्पर्धांना वजनाचा निकष नसे. कुठल्यातरी एका झोनल स्पर्धेसाठी शाळेचा संघ पाठवायचा होता आणि संघात नेमके खेळाडू कमी होते. त्यामुळे शाळेच्या शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांनी मला संघात घेण्याचे ठरवले. ते मला म्हणाले,
Related Posts
“आपल्याकडे खेळाडू नाहीयेत. तू दणकट आहेस. वजनही चांगले आहे तर तूच संघातून खेळ.”
जेव्हा प्रत्यक्ष सामन्यात खेळायची वेळी आली तेव्हा माझी कामगिरी चांगली झाली. माझा खेळ बघून शिक्षकांनी माझे कौतुक केले. माझ्या चांगल्या कामगिरीसाठी मला शाळेकडून खास ट्रॉफी देण्यात आली. कुठलेही प्रशिक्षण किंवा सराव नसताना मी इतकी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे मग पुढे मी कबड्डीमध्येच कारकीर्द करायचे नक्की केले.”
पवनने प्रोकबड्डीच्या सातव्या हंगामात ३६० गुण नोंदवत विक्रमी कामगिरी केली होती. त्याने बंगळुरू बुल्सकडून सहाव्या हंगामाचे विजेतेपदही जिंकले होते.