ऍनिमेशन विश्वालाही कबड्डीची भुरळ

Animation World also fascinated with Kabaddi

क्रीडाक्षेत्र आणि चित्रपट यांचे नाते तसे जुने. आजवर क्रीडापटू आणि क्रीडाक्षेत्रावर अनेक चित्रपट येऊन गेले. कबड्डी या खेळावरही चित्रपटसृष्टीचे प्रेम असल्याचे दिसते. कंगना राणावतचा पंगा चित्रपट असो किंवा स्टुडंट ऑफ द इयर 2 मधील कबड्डी सामन्याचा सिन असो. आता मात्र ऍनिमेशन विश्वालाही कबड्डीची भुरळ पडली आहे.

कबड्डीवर आधारित एक ऍनिमेशन शो लवकरच जपानमध्ये प्रदर्शित होणार आहे. या शोचे नाव ‘बर्निंग कबड्डी’ आहे. बर्निंग कबड्डी ही तातसुया योइगोषी या खेळाडूची गोष्ट आहे. तातसुया हा एक उत्तम फुटबॉलपटू आहे. मात्र शाळा सोडल्यानंतर त्याला खेळात फारशी रुची वाटेनाशी झाली आहे. अशावेळी एक कबड्डी क्लब त्याला आपल्या संघाकडून खेळवण्यासाठी प्रयत्न करतो.यामध्ये पुढे काय होते याबद्दलच्या रंजक घटनांवर आधारित हा शो असण्याची शक्यता आहे.

टॉकिंग टायटन्स या इन्स्टाग्राम हँडलने याबाबत माहिती दिली आहे. असा ऍनिमेशनपट बनण्याची ही पहिलीच वेळ आहे. नुकताच या शो चा ट्रेलरसुद्धा युट्युबवर प्रदर्शित करण्यात आला.