इराण कबड्डीचा ऐतिहासिक निर्णय 

A historic decision from Iran Kabaddi

दोन वर्षांपूर्वी आशियाई स्पर्धांमध्ये भारताला नमवून कबड्डीचे सुवर्णपदक जिंकलेला इराण महिला कबड्डी संघ आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.यावेळी मात्र एका वेगळ्या स्पर्धेच्या निमित्ताने. आशियाई बीच स्पर्धांसाठी एरवी फक्त पुरुष कबड्डी संघ पाठवणाऱ्या इराण कबड्डी संघटनेने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
इराण न्यूज डेली आणि तसनीम न्यूज एजन्सी या दोन वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार बीच कबड्डी स्पर्धांसाठी पुरुष संघाबरोबरच महिलांचाही संघ पाठविण्याचा निर्णय इराण कबड्डी संघटनेने घेतला आहे. इराण कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अब्बास उर्सजी यांनी माहिती दिली.
“आम्ही स्पर्धेसाठी महिलांचा संघसुद्धा पाठवणार आहोत. नेहमीप्रमाणे पुरुषांचा संघदेखील स्पर्धेत सहभागी होईल. इराणच्या महिला संघासाठी आशियाई बीच स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असेल.”
नुकताच इराण पुरुष कबड्डी संघाचा कर्णधार फझल अत्राचली याने बीच कबड्डी स्पर्धेसाठी सराव करत असल्याचा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. करोनाच्या प्रादूर्भावामुळे जगभरात विविध क्रीडा स्पर्धा रद्द होत असताना चीननेही आशियाई बीच स्पर्धां पुढे ढकलल्या आहेत.  त्यामुळे इराणने महिला कबड्डी संघ ह्या स्पर्धांसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला असला तरी तो यावर्षी प्रत्यक्षात येईल असे काही दिसत नाही.