यु म्बाकडून खेळलेला राजगुरु आता त्याच संघाचा झाला प्रशिक्षक; म्हणाला, ‘स्वत:ला सिद्ध करावं लागेल’

क्रीडाक्षेत्र असं आहे, जिथे एखादा व्यक्ती विविध विभागात आपली कारकिर्द घडवू शकतो. त्याचमुळे अनेकदा असे दिसून येते की अनेक खेळाडू आपली मैदानातील कारकिर्द संपल्यानंतर प्रशिक्षण किंवा समालोचन क्षेत्रात उतरलेले दिसतात. नुकताच यु मुम्बाचा एक खेळाडूही आता प्रशिक्षक म्हणून संघाशी जोडला गेला आहे. त्याचं नाव म्हणजे राजगुरु सुब्रमण्यम.

डिफेंडर असलेला राजगुरु गेल्या दोन हंगामात यु मुम्बाकडून खेळाडू म्हणून खेळत होता. आता तो संघाच्या प्रशिक्षण गटाचा भाग झाला आहे. त्याचा एक व्हिडिओ यु मुम्बाच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने प्रशिक्षक बनल्याबद्दल आपली मतं व्यक्त केली आहेत.

मुळचा तमिळनाडूचा असलेल्या राजगुरुने सांगितले की ‘मी अपेक्षा केली नव्हती, मात्र यु मुम्बाने माझ्यावर विश्वास दाखवला. आता मला स्वत:ला सिद्ध करावं लागणार आहे.’

याबरोबरच तो पूर्वी व्हॉलीबॉल खेळाडू असल्याचे सांगताना तो म्हणाला, ‘खरंतर मी व्हॉलीबॉल खेळाडू होतो, कबड्डीपटू नाही. पण २००२ साली ज्यूनियर स्तरावर कबड्डीला सुरुवात केली. त्यानंतर भारतीय क्रीडा प्राधिकरणात सामील झालो. २००४ साली ज्यूनियर एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक विजेत्या संघाचा भाग होतो. तसेच २०१४ साली देखील एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या भारतीय संघाचा भाग होतो. त्यात मनजीत छिल्लरने चांगली कामगिरी केली होती.’

याशिवाय प्रो कबड्डीच्या ६ व्या हंगामात फजल अत्राचलीबरोबर रुम शेअर करण्याच्या अनुभवाबद्दल तो म्हणाला, ‘मागच्यावेळी फजल अत्राचली माझा रुममेट होता. तो खूप चांगला खेळाडू आहे आणि सारखा कबड्डीचाच विचार करतो. दुसऱ्या दिवशी सामना असेल तर तो आदल्यादिवशी झोपतानापण सामन्याचाच विचार करतो आणि त्याने माझ्याशीही तो चर्चा करायचा.’

राजगुरुने प्रो कबड्डीमध्ये पहिल्या हंगामातून तेलुगु टायटन्स संघाकडून पदार्पण केले होते. तसेच त्याने दुसरा हंगाम देखील तेलुगु टायटन्सकडून खेळला. तिसरा हंगाम तो दबंग दिल्लीकडून खेळला. तो चौथ्या आणि पाचव्या हंगामात प्रो कबड्डीचा भाग नव्हता. तसेच सहावा आणि सातवा हंगाम त्याने यु मुम्बाकडून खेळला. त्याने प्रो कबड्डीमध्ये आत्तापर्यंत ४६ सामने खेळताना ५५ गुण मिळवले. तसेच त्याच्या नावे ३ सुपर टॅकल्स आहेत.