कबड्डी विश्वातील सर्वोत्तम खेळ आहे – दीपक हुडा 

Kabaddi is the best sport in the world - Deepak Hooda

कबड्डी हा विश्वातील सर्वोत्तम खेळ आहे असे मला वाटते असे विधान नुकतेच  भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार दीपक हुडा याने केले आहे. जयपूर पिंक पँथर्स संघाशी निगडित सन्स ऑफ द सॉईल ही डॉक्युमेंटरी नुकतीच अमेझॉन प्राईम वर प्रदर्शित झाली. त्या निमित्ताने मेन एक्सपी या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत दीपक बोलत होता. यावेळी त्याने कबड्डीविषयी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.
मेनएक्सपी मासिकाच्या डिजीटल कव्हर वर झळकणारे दीपक आणि अमित हुडा हे पहिले कबड्डीपटू आहेत. यावेळी बोलताना दीपक म्हणाला, “आता लोकांना कबड्डीबद्दल आकर्षण वाटू लागले आहे. मीडियाने देखील कबड्डीला क्रिकेसारखे कव्हर करणे गरजेचे आहे. प्रो कबड्डी लीगमुळे ते शक्य होऊ लागले आहे. एकदा ते झाले की लोकांना कबड्डी सोडून बाकी काही पाहणार नाहीत. कबड्डी अतिशय वेगवान खेळ असल्याने विचार करण्यासाठी फार कमी वेळ मिळतो. त्यामुळे दर्शकांना कंटाळा येण्याची संधीदेखील मिळत नाही.”
दीपकशी सहमती दर्शविताना अमित म्हणाला, “डोळ्याची पापणी मिटून पुन्हा उघडेपर्यंत कबड्डीमध्ये काहीतरी घडलेले असते. टीव्हीवर कबड्डीचा सामना पाहत असताना तुम्ही पाणी पिण्यासाठी उठू शकत नाही. तसे केलेत तरी सामन्यातील एखादा महत्वाचा क्षण तुम्ही गमावू शकता.”
जास्तीत जास्त मुलांनी क्रीडा क्षेत्रात येण्यासाठी काय करावे याबद्दल बोलताना अमित म्हणाला, “प्रत्येक गावात स्वतःचे मैदान असावे जिथे जाऊन मुले खेळू शकतील. सरकारने वेगवेगळ्या खेळांचे कॅम्प आयोजित केले पाहिजेत. या तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्येक गावामध्ये स्थानिक प्रशासनाने प्रशिक्षक नेमावा. असे केल्याने अधिकाधिक तरुण क्रीडा क्षेत्रात येऊ शकतील.”